उरण : बॉम्बहल्ला झाला तर काय परिस्थिती ओढवू शकते आणि आपत्कालीन सुरभा म्हणून काय काळजी घ्यावी याचा अनुभव बुधवारी उरणकरांनी घेतला. उरणच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एन आय हायस्कूल मध्ये बुधवारी सायंकाळी ४ वाजता बॉम्ब हल्ल्याचे मॉक ड्रिल (संरक्षण सराव) करण्यात आले.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी उरणच्या एन. आय. हायस्कूल येथे रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाने मॉक ड्रिल करण्यात आले. यावेळी एका विद्यालयावर झालेल्या कथित बॉम्ब हल्ल्याच्या वेळी आपत्कालीन सुरक्षा म्हणून कशी काळजी घ्यावी व जखमींचा बचाव करावा याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सर्वात प्रथम बॉम्ब हल्ल्याचा इशारा देणारा भोंगा(सायरन)वाजविण्यात आला. त्यानंतर फटाकेरुपी बॉम्ब फोडण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचारी यांना वाचविण्यासाठी पोलीस, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका बोलाविण्यात आल्या. नागरी संरक्षण दलाचे, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांनी जखमी विद्यार्थी रुग्णवाहिकेतून रुग्णालयाकडे नेले. यावेळी सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबाच्या सहाय्याने आग विझवली.
विद्यालयाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या जखमींना दोराच्या सहाय्याने खाली उतरवून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी सेना, पोलीस, एनसीसी, स्थानिक प्रशासन, विद्यालय कर्मचारी आणि सामान्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उरण शहरातील सात ठिकाणी सायरन वाजवण्यात आले आहेत. तहसील कार्यालय, उरण, ओएनजीसी कॉलनी, ग्रुप ग्रामपंचायत चाणजे, जीटीपीएस कंपनी, बोकडविरा, बामर लॉरी, भेंडखळ, ऑल कार्गो कंपनी, कोप्रोली, बल्क गेट कंपनी, मोरा या दरम्यान एन.आय. स्कूल, पंचायत समिती, उरण येथे आग लागल्याच्या बनावावर आधारित मॉक ड्रिल करण्यात आले. यात नागरी संरक्षण दल, वैद्यकीय पथक व इतर आपत्कालीन सेवांकडून बचावकार्य, शोध मोहिमा व नागरिकांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी राज्यसभेचे खासदार धर्यशील पाटील, आ. प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांच्यासह सहआयुक्त डॉ. विशाल नेहुल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, वाहतूक निरीक्षक अतुल दहिफळे, मुख्याधिकारी समीर जाधव, तहसीलदार डॉ. उद्धव कदम आदी उपस्थित होते.
उरण अतिसंवेदनशील क्षेत्र
मुंबईनंतर किनारपट्टीवरील उरण हे येथील ओएनजीसी, जेएनपीए बंदर,भारत पेट्रोलियम आणि वायू विद्युत केंद्र तसेच तेल साठवणूक करणारे केंद्र व गोदाम यामुळे अतिसंवेदनशील ठिकाण असल्याने येथे तणावाच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल घेण्यात आले.