नवी मुंबई : शीव – पनवेल महामार्गावर खारघर ते कळंबोली या दरम्यान शुक्रवार रात्री घडलेल्या भीषण अपघातात एका ४२ वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू झाला. रोडपालीजवळील कासाडी नदी पुलावर हा हृदयद्रावक प्रकार घडला.
कर्नाटकातील बेंगळुरू जिल्ह्यातील रहिवासी जोबीन बेनेडिक्ट हे कामानिमित्त खारघर येथे आले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास ते पुण्याकडे जाण्यासाठी स्वतःच्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने निघाले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीव पनवेल महामार्गावर वेगवान मोटार चालविल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मोटारीवरील नियंत्रण सुटल्यावर जोबीन बेनेडिक्ट यांची मोटार उजव्या बाजूकडून थेट पुलाच्या डाव्या बाजूच्या संरक्षण कठाड्यावर आदळली. धडकेचा जोर एवढा जबरदस्त होता की कठाडा तुटत स्विफ्ट मोटार तब्बल २५ फूट खाली खाडीच्या पाण्यात कोसळून पलटी झाली.
अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. अनेक मिनिटे वाहतूक कोंडी होती. खारघर पोलीस, वाहतूक शाखा आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. क्रेनच्या साहाय्याने मोटार व जखमी जोबीने यांना खाडीपात्रातून वर काढण्यात आले. जोबीन बेनेडिक्ट हे गंभीर अवस्थेत सापडले आणि त्वरित पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या दुर्घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अशोक गिते व डॉ. राठोड यांनी जोबीन यांच्या शवाचे विच्छेदन केले. त्यावेळी जोबीन यांचा पाण्यात बूडून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. निष्काळजीपणाने मोटार चालवल्याप्रकरणी या घटनेत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास खारघर पोलीस करीत आहेत.
