सीबीडीत रविवारी ‘बटरफ्लाय डे’; अॅग्रो सामाजिक संस्थेकडून २५ वर्षांपासून संगोपन
नवी मुंबई : नवी मुंबईकडे क्राँक्रीटचे जंगल म्हणूनच पाहिले जाते. निर्सगप्रेमी नागरिक या शहरात राहण्यास सहसा तयार होत नाहीत, मात्र सिमेंटच्या या जंगलात काही संस्थांनी पक्षी, प्राणी, फुलपाखरे, फुलझाडे, फळझाडे यांचे चांगलेच संरक्षण आणि संर्वधन केल्याचे दिसून येते. अशाच एका निर्सगप्रेमी संस्थेने सीबीडी येथे रविवारी ‘बटरफ्लाय डे’ आयोजित केला आहे. संस्थेने गेली २५ वर्षे संगोपन केलेल्या वनसंपदेमुळे या निर्सगउद्यानात आता शेकडो फुलपाखरे बागडताना दिसत आहेत. त्याची अनुभती सर्वाना घेता यावी यासाठी सीबीडी रेसिडेन्सी एग्रो सोसायटीने १३ डिसेंबरला पहाटे हे फुलपाखरांचे उद्यान सशुल्क खुले केले आहे.
सीबीडी सेक्टर नऊमधील रहिवाशांनी २५ वर्षांपूर्वी निर्सगाचे संवर्धन व संगोपन करण्यासाठी एक अॅग्रो सामाजिक संस्था स्थापन केली. नवी मुंबईतून जाणाऱ्या टाटा पॉवरच्या उच्चदाब विद्युतवाहिन्यांच्या खाली कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. त्यामुळे सिडकोने या जमिनी अतिक्रमणे होऊ नये यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणविषयक व प्रकल्पग्रस्तांना भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. एग्रो सोसायटीने त्यांच्या गृहसंकुलाच्या समोर सेक्टर नऊमधील पारसिक डोंगराच्या पायथ्याशी असलेली एक हेक्टर म्हणजेच अडीच एकर जमीन निर्सग संवर्धनासाठी भाडेतत्त्वार घेतली. मोठय़ा प्रमाणात जंगली झाडे, झुडपे, उंच सखल, असलेल्या या भूखंडाला संस्थेच्या सदस्य व समाजसेवकांनी आकार दिला. त्यामुळे या जागेत मोठय़ा प्रमाणात फळ व फुलझाडे लावण्यात आली असून फुलपाखरे आर्कषित होतील अशी फुलझाडांची अधिक लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी गेली सहा वर्षे वनौषधी व भाजी सेंद्रिय खतावर पिकवली जात असून या भाजीची विक्री आजूबाजूच्या नागरिकांना समाज माध्यमांद्वारे केली जात आहे. उद्यानासाठी लागणारी रोपांची लागवड करून नर्सरीचेही संगोपन करण्यात आले आहे. करोनाच्या काळात नागरिकांना ताजी भाजी मिळणे या उद्यानामुळे शक्य झाले आहे. विविध प्रकारे विकसित करण्यात आलेल्या या उद्यानात एक कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असून त्यात कमळे फुलविण्यात आलेली आहेत. चारही बाजूने सिमेंटचे जंगल असलेल्या या नोडमध्ये निर्सगप्रेमी नागरिकांनी नंदनवन फुलविले आहे. वाढत्या फुलझाडे आणि डोंगर रांगामुळे अनेक प्राणी, पक्षी या उद्यानाकडे आर्कषित होत असून फुलपाखरांचे ४० ते ५० प्रकार आढळून येत आहेत. त्यामुळे करोनानंतर मिळालेल्या उसंतीमध्ये निर्सगाकडे आर्कषित करण्यासाठी आबालवृद्धाना रंगीबेरंगी फुलपाखरांचा अनुभव येत्या रविवारी दिला जाणार असल्याचे संस्थेच्या जुई खोपकर यांनी सांगितले. सकाळी पावणेआठ वाजता सुरू होणारा हा फुलपाखरे सहवास दुपापर्यंत चालणार आहे.