विकास महाडिक
जागतिक तापमान वाढ या समस्येवर तोडगा काढण्याची गरज असून नवी मुंबई पालिकेने किमान त्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. पालिकेने शहरातील सर्व मोकळय़ा जागांवर जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे. त्याचबरोबर पर्यावरण पूरक प्रकल्पांवर
भर दिली जात आहे. महापालिका प्रशासनाने ‘कार्बन ऑडिट’ करण्यास सुरुवात केली आहे.
जागतिक पातळीवर वायुप्रदूषण ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. प्रगत देशांनी प्रगतीच्या नावावर आतापर्यंत मोठय़ा प्रमाणात हरितगृह वायू अर्थात कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जित केलेला आहे. त्याचे दुष्परिणाम जग सध्या भोगत असल्याचे दिसून येत आहे. या वायूमुळेच आज उष्णतेचे प्रमाण वाढले असून अंगाची काहिली होत आहे. विकसित देशातील बर्फाचे डोंगर वितळून नद्यांचे पाणी वाढले आहे. एकूण कार्बन डाय ऑक्साईडचे हवेतील प्रमाण वाढू लागल्याने जागतिक तापमानात वाढ होऊ लागली आहे. ही समस्या एका देशापुरती मर्यादित नाही. ती जगाची समस्या झाली आहे पण या समस्येवर तोडगा देशातील प्रत्येक राज्य, शहर आणि गावांनी काढण्याची गरज आहे.
नवी मुंबई पालिकेने किमान त्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. कार्बन क्रेडिट म्हणजे काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. त्यामुळे हा मुद्दा अधिक स्पष्ट होणे आवश्यक असून पालिकेने किंवा पर्यावरणविषयक संस्थांनी याबाबत प्रबोधन करण्याची गरज आहे. नवी मुंबई पालिकेने कार्बन क्रेडिट मिळविण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. विकसित देशांनी केलेला पर्यावरणाचा ऱ्हास भरून काढण्यासाठी आता विकसित देशांनी यात भर टाकू नये यासाठी त्यांना कार्बन क्रेडिट दिले जाणार आहे. कार्बन डाय ऑक्साईडमुक्त देश किंवा शहर करणे तसे मुश्कील आहे पण कमीत कमी कार्बन डाय ऑक्साईड निर्माण करणाऱ्या संस्थांना कार्बन क्रेडिट अर्थात हे एक आर्थिक साधन ठरू शकणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम कार्बन डाय ऑक्साईड किती निर्माण होत आहे याचा अभ्यास केला जाणार आहे. आपण किती घाण निर्माण करीत आहोत हे कळल्यानंतरच ती कशी स्वच्छ करता येईल याचा आराखडा तयार करता येणार आहे. त्यामुळे पालिका कार्बन ऑडिट करणार आहे. जवळपास १०५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात किती कार्बन डाय ऑक्साईड तयार होत आहे हे लक्षात आल्यानंतर यावरील उपाययोजनांना सुरुवात केली जाणार आहे. हे कार्बन कमी करण्यासाठी उत्सर्जन कपात युनिट बसविण्याची गरज असून पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्यासाठी धोरणे राबविण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. या कार्यात केवळ प्रशासकीय निर्णय आवश्यक नाही तर या भविष्याचा वेध घेणाऱ्या या चळवळीत प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानात इंदौर गेली पाच वर्षे पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे कारण तेथील नागरिकांचा या अभियानातील सहभाग हे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे कार्बन क्रेडिट वाढविण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी पांठिबा आणि सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी कार्बन क्रेडिट म्हणजे काय हे समजून घेण्याची गरज आहे. आतापर्यंत पालिकेने राबविलेले सर्व प्रकल्प हे कार्बन डाय ऑक्साईड निर्माण करणारे आहेत. आपल्या हातातील मोबाइल फोन हा देखील कार्बन डाय ऑक्साईड निर्माण करणारे एक प्रभावी साधन आहे. त्यामुळे मोबाइलचा कमीत कमी वापर करणे हा नागरिकांचा प्रयत्न शहराला कार्बन क्रेटिड मिळवून देण्यास हातभार लावणारा आहे. पालिकेने शहरातील सर्व मोकळय़ा जागांवर जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे. ही वृक्ष लागवड करण्यात नागरिकांनी पुढाकार घेतल्याशिवाय त्यांचे संर्वधन व संगोपन होणार नाही. घनदाट झाडी निर्माण करण्याचा प्रयत्न पालिका करीत आहे. कोपरखैरणे येथे जपानच्या मियावॉकी तंत्रज्ञानाने लावण्यात आलेल्या झाडांनी आता चांगलाच जोर धरला आहे. या ठिकाणी या झाडांमुळे जैवविविधता वाढली आहे. नवी मुंबईला साठ किलोमीटर लांबीचा खाडीकिनारा लाभला आहे. यात वाढणाऱ्या खारफुटीला जीवनदान मिळाल्यापासून त्यात झपाटय़ाने वाढ झाली आहे. यामुळे खाडीचे पाणी शहरात घुसण्यापासून संरक्षण तर मिळाले आहेच त्यापेक्षा या झाडामुळे जैवविविधता वाढीस लागली आहे. कार्बन क्रेडिटमधील हा एक प्रयत्न आहे. अशाच प्रकारे खालापूर तालुक्यातील मोरबे धरणाच्या परिसरात एक लाखापेक्षा जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. पालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंर्तगत ज्या पध्दतीने भिंतीवर झाडे, वृक्ष, वल्ली यांची चित्रे काढली आहेत. तेवढय़ा प्रमाणात तरी झाडे लावली गेली तर हा कार्बन क्रेडिटच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सर्वाधिक प्रदूषित व उष्णता देणारे शहर म्हणून महामुंबईची ओळख आहे. दगडखाणी आणि नव्याने निर्माण होणारे विमानतळ तसेच अनेक विकास प्रकल्प बांधकामे यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे. त्यासाठी केवळ नवी मुंबई पालिकेनेच नाही तर आजूबाजूच्या सर्वच पालिकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मनुष्य वापरत असलेल्या प्रत्येक घटकापासून कार्बन डाय ऑक्साईड निर्माण होण्यास हातभार लागत आहे. या साधनांचा कमी वापर करणे हे आपल्या भावी पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. पालिकेने सुरू केलेल्या या उपक्रमाला कार्बन क्रेडिट म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित न करता या भविष्यातील कार्याला प्रत्येक नवी मुंबईकरांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2022 रोजी प्रकाशित
शहरबात: नवी मुंबईत ‘कार्बन ऑडिट’
जागतिक तापमान वाढ या समस्येवर तोडगा काढण्याची गरज असून नवी मुंबई पालिकेने किमान त्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.
Written by विकास महाडिक

First published on: 26-04-2022 at 01:30 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Carbon audit navi mumbai navi mumbai municipality municipal administration air pollution amy