दंडवसुलीत अडथळे; नोटाबंदीमुळे महसुलात ६० टक्के घट
नोटाबंदीच्या निर्णयामुळे नवी मुंबईच्या वाहतूक विभागाला नोव्हेंबरपासून सुमारे ६० टक्के महसुलाला मुकावे लागले आहे. केंद्र व राज्य सरकारने रोकडरहित व्यवहाराचा हट्ट केला असला तरी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून रस्त्यावर महसूल गोळा करणाऱ्या वाहतूक पोलिसांकडे स्वाइप मशीन नसल्याने वसुलीत अडथळे येत आहेत. वाहतूक पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तीच्या खिशात डेबिट कार्ड असले तरी या कार्डमधून पैसे वसूल कसे करावेत, असा प्रश्न नवी मुंबईच्या पोलिसांना पडला आहे. सध्या १५ पोलीस ठाण्यांपैकी एकाही पोलीस ठाण्याकडे स्वाइप मशीन नाही. त्यामुळे सरकारनेच सरकारचा महसूल बुडविल्याचे बोलले जात आहे. मागील महिन्यात सुटय़ा पैशांच्या गोंधळामुळे कारवाई व महसुलाची आकडेवारी कमी झाली होती, ही स्थिती आता काही प्रमाणात सुधारत असल्याचे सांगून पोलीस सारवासारव करीत आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये वाहतूक विभागाची स्वतंत्र १५ पोलीस ठाणी आहेत. त्यामध्ये सुमारे साडेचारशे पोलीस कार्यरत आहेत. या सर्व पोलिसांची डोकेदुखी नोटाबंदीमुळे वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट दंडाची तरतूद करण्यात आल्यामुळे वाहतूक पोलिसांची तिजोरी महसुलाने तुडुंब भरेल, अशी अपेक्षा होती. पनवेल, कळंबोली, वाशी, तुर्भे व उरणसारख्या पोलीस ठाण्यांकडून तिजोरीत सुमारे ८ ते ९ लाख रुपयांचा महसूल महिन्याला गोळा होतो. परंतु सध्या हा आकडा चार लाख रुपयांच्या वर गेलेलाच नाही. नोव्हेंबर २०१५मध्ये ३१ हजार वाहनचालकांना नियमभंग केल्याप्रकरणी पकडले होते. यंदा नोव्हेंबरमध्ये हीच आकडेवारी २४ हजारांवर आली आहे. डेबिट कार्डद्वारे महसूल घ्या, असे सांगत असल्याची माहिती वाहतूक पोलीस देतात. प्रत्येक पोलीस ठाण्याला दोन ते तीन स्वाइप मशीन देण्यात याव्यात, असे त्यांचे म्हणणे आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अरविंद साळवे हे हिवाळी अधिवेशनाच्या कामासाठी नागपूरला गेल्या त्यांचे मत समजले नाही.