नवी मुंबई: नवी मुंबईतील वाशी येथील एका वाईन शॉपचे शटर उचकटून आतील १७ लाख ३८ हजार ५८८ रुपयांचे महागडे मद्य आणि २० हजाराची रोकड चोरी केली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस त्या मद्य चोराचा शोध घेत आहेत. नवी मुंबईतील वाशी गावातील सिद्धिविनायक इमारतीतील “व्ही फाय लिव्हिंग लिक्विड्स” हे वाईन शॉप आहे.
१० तारखेला नेहमी प्रमाणे दुकान बंद करण्यापूर्वी हिशोब पूर्ण करून दुकान बंद करून कामगार रोखपाल आणि व्यवस्थापक निघून गेले. दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ तारखेला दुकान उघडण्यास आले असता दुकानाचे शटर उचकटून आत कोणी तरी प्रवेश करून चोरी केली असावी असा संशय आला. कसे बसे शटर उघडून आत प्रवेश केला असता आतील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.
शिवाय गल्ला उघडून आतील वीस हजार रुपयांची रोकड चोरी झाल्याचे निदर्शनास आले. तसेच पूर्ण मालाची तपासणी केली असता दुकानातील महागड्या मद्याच्या १०७ बाटल्या कमी आढळून आल्या. त्याचे बाजार मूल्य १७ लाख ३८ हजार ५८८ रुपये आहे. या व्यतिरिक्त गल्ल्यातील २० हजार असे एकूण १७ लाख ५८ हजार ५८८ रुपयांची चोरी झाल्याचे समोर आले.
दुकानात चोरी काय काय झाले याची तपासणी (ऑडिट) करण्यात एक दिवस गेला. हि तपासणी पूर्ण झाल्यावर फिर्यादी यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरोधात चोरीचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप देशमुख करीत आहेत.