नवी मुंबई : शहरात एक हजार सीसीटीव्ही बसविण्यासाठी काढलेल्या निविदेसाठी १२० कंत्राटदारांनी रस दाखविल्यानंतर महापालिका प्रशासनाने निविदा प्रक्रियेला आता तिसरी मुदतवाढ दिली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे शहरात सीसीटीव्ही कॅमेरे कधी बसणार असा सवाल नवी मुंबईकर करीत आहेत.

नवी मुंबई पालिकेने पोलिसांना तपासात सहकार्य होईल असे सीसीटीव्ही कॅमेरे दहा वर्षांपूर्वी शहरात बसविले होते. शहराच्या मोक्याच्या ठिकाणी २६८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते, मात्र हे कॅमेरे आता देखभाल आणि आधुनिक तत्रज्ञानाअभावी शरपंजरी पडले आहेत. त्यांच्या जागी नव्याने एक हजार ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असून पालिका या प्रकल्पावर १५४ कोटी रुपये खर्च करीत आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. मात्र अजूनही हे सीसीटीव्ही निविदा प्रक्रियेत अडकले आहेत.

तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा सीसीटीव्हींचा प्रस्ताव आणला होता. मात्र त्याला विरोध झाला. त्यानंतर डॉ. रामास्वामी यांच्या काळात २५ जून २०१९ हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर स्वारस्य अभिव्यक्ती सूचना मागवण्यात आल्या. मात्र रामास्वामी यांची बदली झाल्यानंतर आलेले आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ही अभिव्यक्ती सूचना प्रक्रियाच रद्द केली. त्यानंतर विद्यमान आयुक्त अभिजीत बांगर यांनी २९ सप्टेंबर २०२० ला याबाबत निविदा प्रसिद्ध केली. निविदापूर्व बैठकीत १५९५ हरकती आल्या होत्या. त्या सूचना, हरकती दूर करीत १२ नोव्हेंबरला निविदा प्रक्रियेला दुसरी मुदतवाढ देण्यात आली.

यात १२० कंत्राटदारांनी रस दाखविला होता. एका निविदेसाठी प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कंत्राटदार स्पर्धेत उतरले होते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी हा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून जानेवारीपर्यंत निविदेचे कार्यादेश देण्यात येतील. त्यानंतर आठ-नऊ महिन्यांत शहरात संपूर्ण अद्ययावत व आधुनिक असे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील असे जाहीर केले होते. मात्र आता या निविदाप्रक्रियेला तिसरी मुदतवाढ देण्यात आली आहे. २१ डिसेंबपर्यंत ही मुदतवाढ आहे.

शहरात सीसीटीव्ही लावण्याच्या कामाबाबत काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत जास्तीतजास्त ठेकेदारांनी सहभाग घ्यावा व स्पर्धा व्हावी यासाठी निविदा प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

– सुरेंद्र पाटील, शहर अभियंता