नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समितीतील ठोक सुका मेवा विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सुका मेवा घेत देयक चुकते करून एका किरकोळ व्यापाऱ्याने त्यांचा विश्वास संपादित केला. विश्वास संपादन होताच विविध नावांनी थोडे थोडे करून तब्बल ४५ लाख ४३ हजार रुपयांचा सुका मेवा उधारीवर घेतला. त्याला अनेकदा पैसे मागण्यात आले, मात्र त्याने सुरवातीला टाळाटाळ केली आणि सध्या तर संपर्कच नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तीनजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशियातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ आहे. या ठिकाणी इतर कृषी उत्पन्नाप्रमाणेच सुका मेवाची कोट्यवधींची उलाढाल होत असते. यात अनेकवेळा व्यवहार हा विश्वासाच्या जोरावर होत असतो. याचाच फायदा घनश्याम तलाविया या व्यक्तीने घेतला. कृषी उत्पन्न बाजार समितीतील मसाला मार्केटमध्ये किशोर मोदी यांचा सृष्टी सेल्स अॅण्ड सर्व्हिस नावाचे दुकान असून, ते ठोक काजूचा व्यवसाय करतात. २०२२ साली एप्रिल महिन्यात घनश्याम तलाविया नावाची व्यक्ती व्यवसाय निमित्त त्यांच्या संपर्कात आली.
हेही वाचा – नवी मुंबईत उद्दिष्टापेक्षा अधिक ६१५ कोटीची विक्रमी मालमत्ताकर वसूली
घनश्याम याने सुरवातीला त्यांच्याकडून काजू व त्यांनी सुचवलेल्या अन्य व्यापाऱ्याकडून बदाम पिस्ता अशा सुक्या मेव्याची खरेदी सुरू केली. आणि काही काळात खरेदीच्या प्रमाणात वाढ झाली. घनश्याम हा दरवेळी त्वरित देयक देत किंवा दिलेल्या वेळेत पैसे देत होता. घनश्याम हा विपुल त्रपासीया आणि मेहुल कथारिया यांच्या नावे देयक देण्यास सांगत होता. पैसे वेळेवर देत असल्याने त्याच्यावर मोदी यांचा विश्वास बसला होता. त्यानंतर त्याने मोठ्या प्रमाणात माल हवा असल्याची सूचना देत त्याप्रमाणे खूप मोठी खरेदी ठराविक अंतराने केली. मात्र त्याचे पैसे दिले नाही. अशा पद्धतीने त्याने ६ ऑक्टोबर २०२२ ते आजपर्यंत एकूण ४५ लाख ४३ हजार रुपयांचा सुका मेवा मोदी आणि इतर काही व्यापाऱ्यांकडून घेतला. मात्र त्याचे पैसे दिले नाहीत. याबाबत सुरवातीला घनश्याम याच्याशी वारंवार संपर्क करण्यात आला. मात्र त्याने टाळाटाळ सुरू केली. याशिवाय त्याने दिलेल्या घराच्या व दुकानाच्या पत्त्यावर पाहणी केली असता त्या ठिकाणी तो आढळून आला नाही. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मोदी यांच्या फिर्यादीवरून एपीएमसी पोलिसांनी घनशाम तलाविया, विपुल त्रपासीया आणि मेहुल कथारिया यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.