चिंचोली उद्यान, ऐरोली, सेक्टर ५
झेन संकल्पनेवर आधारलेले चिंचोली उद्यान म्हणजे गजबजलेल्या ऐरोलीतील मानसिक शांततेचा कोपरा. जपानी शिल्पशैलीचा छाप असणारे पुतळे, वृक्ष आणि हिरवळीची आगळीवेगळी रचना यामुळे हे उद्यान प्रेक्षणीय ठरते. मोकळ्या हवेत व्यायाम करण्यासाठी, मुलांना खेळता यावे म्हणून, निवांतपणे वाचन करण्यासाठी, मानसिक शांतता मिळवण्यासाठी, मित्रांना भेटण्यासाठी अशा अनेक कारणांनी परिसरातील रहिवाशांची पावले या उद्यानाकडे वळतात.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर ५ येथील चिंचोली उद्यानाचा कायापालट करण्यात आला आहे. जपानी झेन संकल्पनेनुसार या उद्यानाची रचना करण्यात आली आहे. उद्यानात पहाटे पाचपासूनच फेरफटका मारणाऱ्यांची गर्दी असते. उद्यान अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे. उद्यानात आकर्षक प्रकाशयोजना करण्यात आली आहे. त्यामुळे मन प्रसन्न होते. उद्यानात आल्यानंतर जपानमधील एखाद्या उद्यानात पोहोचल्याचा भास होतो. जपानी पद्धतीचे पुतळे उद्यानात आहेत. अॅम्फिथिएटरदेखील आहे. तर चालण्याचा व्यायाम करणाऱ्यांसाठी मार्ग तयार करण्यात आला असून तिथे आकर्षक लाद्या बसवण्यात आल्या आहेत. त्यावर मॅट टाकण्यात आले आहे. लहान मुलांसाठी आकर्षक आणि कल्पक खेळणी आहेत. त्यामुळे सकाळी अनेक आई-बाबा आपल्या मुलांना घेऊन येतात. त्यांचाही व्यायाम होतो आणि मुलांना मोकळ्या हवेत खेळता येते.
या उद्यानात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आहे. शौचालयाची सोय आहे. व्यायाम करून थकल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी सुविधा देण्यात आल्या आहेत. उद्यान आकर्षक असल्यामुळे तिथे महाविद्यालयातील तरुणांचे घोळके येतात. सुंदर पाश्र्वभूमीवर सेल्फी काढण्यात, गप्पांमध्ये ते मग्न झालेले दिसतात. संध्याकाळी आई-बाबा किंवा आजी-आजोबांबरोबर अनेक लहान मुले इथे येतात. त्यांच्या किलबिलाटाने उद्यान गजबजून जाते.
या उद्यानामध्ये श्रवण गायकवाड हे सकाळी पाच वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत मोकळ्या हवेत फेरफटका मारतात. व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक असणारे गायकवाड हे पूर्वी दिल्लीमध्ये राहत होते. तिथे असतानाच त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. चार वर्षांनी मुंबईत आल्यानंतर इथल्या दमट वातावरणात त्यांचा त्रास कमी झाला. त्यांनी गोळ्या घेणे बंद केले. त्याचा परिणाम त्यांच्या मूत्रपिंडांवर झाला, ती निकामी झाली. आता त्यांना पंधरवडय़ातून एकदा डायलिसिससाठी रुग्णालयात जावे लागते. जेव्हा रुग्णालयात जायचे असते तो दिवस वगळता रोज उद्यानात येत असल्याचे ते सांगतात. चालतात, योगसाधना करतात. या व्यायामाने दिवस चांगला जातो, असे ते सांगतात.
पोलीस खात्यात असल्यामुळे व्यायम करण्याची सवय होती. पण महिन्याभरापूर्वी सेवानिवृत्त झालो. तब्येत सांभळण्यासाठी रोज योगा करतो. रोज सकाळी तासभर चालतो. त्यामुळे मन:शांती मिळते.
– सुधाकर गुडेकर, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी
सकाळी चालल्यांनतर दिवसभर मन प्रसन्न राहते. या नित्यक्रमामुळे लवकर उठण्याची सवय लागली आहे. त्यामुळे आळस दूर होतो. काम करण्यास ऊर्जा मिळते.
– अक्षय सोने, विद्यार्थी
या उद्यानात योगा करण्यासाठी मी येते. योगा केल्यावर दिवसभर मन प्रसन्न राहते. तसेच काम करण्याची ऊर्जा मिळते. येथे आल्यामुळे अनेकांशी स्नेहसंबंध जोडले गेले आहेत. त्याचाही आनंद आहे. सकाळी चालण्यासाठी पावले आपोआप उद्यानाकडे वळतात.
– अशीष मॅथ्यू, नागरिक
कामामध्ये व्यग्र असल्यामुळे मुलांना वेळ देता येत नाही. त्यामुळे सकाळी चालायला येताना मुलांना घेऊन येते. माझेही शरीर सुदृढ राहते व मुलांसाठीदेखील पुरसा वेळ देता येतो.
– मंजुश्री घोले, महिला
