ऐरोली दिवागाव येथील सिडकोच्या भूखंडावर उभारलेल्या टोलेजंग इमारतीवर सिडकोचा हातोडा पडला आहे. मंगळवारी यापैकी चार इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. सिडकोच्या या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणाणले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत असताना नवरात्रोत्सव, दिवाळीसारख्या सणासुदीमुळे कारवाईला स्थगिती देण्यात आली होती. याचा फायदा घेत विकासकांनी पुन्हा अनधिकृत बांधकामे सुरू केली होती. या बांधकामाला आळा घालण्यासाठी सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने गुरुवारपासून ऐरोली परिसरात कारवाईचा धडका लावला आहे. गुरुवारी चार इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या तर मंगळवारी आणखी चार इमारती या जमीनदोस्त करण्यात आल्या. प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
यांसदर्भात सिडको अनाधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक योगेश म्हसे म्हणाले की, सिडकोचा जागेवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात एमआरटीपीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असून कारवाईचा खर्च त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे. कारवाई झालेल्या भूखंडावर कुंपण टाकण्यात येणार आहे. ऐरोली परिसरात अशा ३३ इमारती आहेत.