नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्यांमुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी रस्त्यावर उतरुन सिडको विरोधात पाच दिवसांपूर्वी रास्ता रोको केले होते. या आंदोलनानंतर सिडको मंडळाला जाग आली आहे. मंडळाने नवीन पनवेल आणि रोडपाली उड्डाणपुलावरील दुरुस्तीच्या कामासाठी सहा कोटी रुपयांची निविदा जाहीर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्ड्यांवरुन भाजपा आक्रमक; भर पावसात रस्तारोको

सिडको मंडळाला जाग

सिडको मंडळाने बांधलेल्या नवीन पनवेल वसाहत आणि रोडपाली येथील उड्डाणपुलावरील खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते. तसेच वाहतूक कोंडी नित्याची झाली होती. नवीन पनवेल पुलावरील खड्यांसाठी सूरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांनी समाजमाध्यमांव्दारे वाचा फोडली. तर सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत सिडको अधिका-यांची भेट घेतली. सिडको मंडळाचे पालघर व रेल्वे विभागाचे अधिक्षक अभियंता यांनी रोडपाली फुडलँण्ड पुलासाठी ३ कोटी ४९ लाख ६९ हजार ८८५ रुपये तर नवीन पनवेल पुलासाठी २ कोटी ४८ लाख ६९ हजार ८३९ रुपयांचा खर्च करणार आहे. या कामांमध्ये उड्डाणपुलावरील खड्डे बुजवून डांबरीकरण करणे आणि पोचरस्त्याच्या कॉंक्रीटीकरण करणे अशी कामे आहेत.

हेही वाचा- मुंबई वाशी मार्गावर १० लेनचा नवीन टोलनाका! मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे रस्ते विकास महामंडळाचे लक्ष

सिडको मंडळाच्या कारभाराविरोधात प्रवासी संतप्त

नवीन पनवेल वसाहत ते पनवेल शहराला जोडणारा पुलावरील वाहतूक जिवघेणी झाली होती. विद्यार्थ्यांची वाहतूक याच पुलावरुन होत असल्याने पालकांसाठी चिंतेची बाब होती. अशीच परिस्थिती तळोजा औद्योगिक वसाहत ते मुंब्रा पनवेल महामार्ग जोडणा-या उड्डाणपुलावर होती. अवजड वाहनांचा सर्रास वावर असल्याने मोठ्या खड्डे या पुलावर होते. गेल्या तीन महिन्यात खड्डे बूजवण्याचा प्रयत्न सिडको मंडळाने केला. मात्र, त्यानंतरही परिस्थिती सुधारत नव्हती. त्यामुळे राजकीय व सामाजिक संघटन व प्रवासी सिडको मंडळाच्या कारभाराविरोधात संतापले होते.

हेही वाचा- उड्डाण पुलाखालील जागा शालेय बसला आंदण ?

खड्ड्यांविरोधात भाजपाचे आंदोलन

दोन आठवड्यांपूर्वी मनसेच्या पदाधिका-यांनी नवीन पनवेल येथील पुलावर सिडको मंडळाचे अधिकारी रात्रीच्या वेळी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याचे काम करत असताना मनसेच्या पदाधिका-यांनी ते काम बंद पाडले. तर सामाजिक कार्यकर्त्यांनी ही परिस्थिती सिडको मंडळाचे मुख्य अभियंता डॉ. के. एम. गोडबोले यांच्यासमोर मांडले. यानंतर मुख्य अभियंता डॉ. गोडबोले यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना महिन्याभरात या पुलावरील खड्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी निविदा प्रक्रीया जाहीर करु असे आश्वासन दिले होते. या दरम्यान भाजपचे पनवेल शहराचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी आंदोलन करण्याचे लेखी पत्र सिडको मंडळाला दिले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयासमोर रास्तारोको करण्यात आला. भरपावसात आमदार प्रशांत ठाकूर हे असंख्य कार्यकर्त्यांसह रस्त्यावर ठिय्या मांडून काही तास बसले. वैतागलेल्या नवीन पनवेलकरांचा या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला. अखेर सिडको मंडळाने आंदोलकांना दिलेला शब्द पाळत पुलावरील कामासाठी निविदा जाहीर केली. 30 सप्टेंबरनंतर या कामासाठी कंत्राटदार बोली लावू शकणार आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cidco board has announced a tender of rs 6 crore for repair work on new panvel and roadpali flyovers dpj
First published on: 27-09-2022 at 10:45 IST