नवी मुंबई: १५ दिवसांत फुटबॉल तर्फ हटवण्याचे सिडकोचे निर्देश, तरीही शाळांची मुजोरी सुरूच; काय आहे प्रकरण? | CIDCO directive to remove football schools continue to suffer navi mumbai amy 95 | Loksatta

नवी मुंबई: १५ दिवसांत फुटबॉल तर्फ हटवण्याचे सिडकोचे निर्देश, तरीही शाळांची मुजोरी सुरूच; काय आहे प्रकरण?

नवी मुंबई शहरात सिडकोने स्थानिकांच्या जमिनी संपादन केल्यानंतर आजही शहरातील अनेक मूळ गावांसाठी हक्काची खेळाची मैदाने नाहीत.

cidco
१५ दिवसांत फुटबॉल तर्फ हटवण्याचे सिडकोचे निर्देश, तरीही शाळांची मुजोरी सुरूच

नवी मुंबई शहरात सिडकोने स्थानिकांच्या जमिनी संपादन केल्यानंतर आजही शहरातील अनेक मूळ गावांसाठी हक्काची खेळाची मैदाने नाहीत.बेलापूर, आग्रोळी,दारावे यासह अगदी दिघ्यापर्यंत अनेक गावांना हक्काची मैदानेच नाहीत.तर दुसरीकडे शहरात शाळांना करारनामे करुन दिलेली मैदाने ही शाळेच्या वेळाव्यतिरिक्त व सुट्टीच्या दिवशी स्थानिक नागरीकांना खेळण्यासाठी खुली ठेवण्याची अट असतानादेखील अनेक शाळांनी मैदाने कुलुपबंद करुन ठेवली असून याच मैदानावर फुटबॉल टर्फ उभारुन व्यावसायिक वापर सुरु केला आहे.याबाबत मनविसेने मैदानांवर अवैधरित्या “फुटबॉल टर्फ” उभारून नवी मुंबईतील मैदाने बळकावल्याप्रकरणी खाजगी शिक्षण संस्थांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सिडको प्रशासनाने मैदाने बळकावलेल्या खाजगी शिक्षण संस्थांना नोटीस काढून फुटबॉल टर्फ १५ दिवसांत निष्कासित करण्याचे आदेश दिले आहेत व तसे न केल्यास सिडको प्रशासन संबंधित शिक्षण संस्थांचे करारनामे रद्द करेल असे या नोटीस मध्ये म्हटले आहे. परंतू सिडकोने लेखी आदेश दिल्यानंतर शाळांची मुजोरी सुरुच असून सीवूड्स येथे फुटबॉल टर्फ उभारणी नव्याने सुरु असलेले काम विनादिक्कत सुरु असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>>नवी मुंबई: एपीएमसीत कांद्याची बंपर आवक, दर गडगडले

नवी मुंबई शहरात शाळांना भूखंड दिले असताना शाळेशेजारी अनेक शाळांना ४ ते ५ हजार चौ.मीचे भूखंड करारनामा करुन दिले आहेत.नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत तसेच शाळा तेथे मैदान हवे व शाळेच्या वेळा व्यतिरिक्त मैदान सर्वसामान्य स्थानिकांना खेळासाठी उपयोगी येतील यासाठी सिडकोने ही मैदाने खाजगी संस्थेला करारनामे करुन दिली परंतु नवी मुंबईतील अनेक शिक्षण संस्थांनी ही मैदाने बंदिस्त करून त्यावर पक्के बांधकाम करून फुटबॉल टर्फ उभारले आहेत. तसेच ही फुटबॉल टर्फ त्रयस्थ संस्थांना भाडे तत्वावर देऊन या सार्वजनिक मैदानांचा आर्थिक फायद्यासाठी गैरवापर सुरु असल्याचे चित्र आहे. नवी मुंबईतील अनेक शैक्षणिक संस्थांनी ही मैदाने बंदीस्त करुन टाकली आहे. हे मैदान शाळेच्या वेळाव्यतिरिक्त व सुट्टीच्या दिवशी स्थानिकांना खेळासाठी उपलब्ध राहतील असा कोणताही फलक लावला नाही. उलट शाळेव्यतिरिक्त मैदानात खेळायला का परवानगी नाही असे विचारणा केली असता शाळेचे मैदान आहे असे सांगून आरेरावी केली जाते. तसेच मैदानांमध्ये प्रवेश करता येऊ नये यासाठी कुंपन घालून सुरक्षारक्षक नेमलेले आहेत.

हेच फुटबॉल टर्फ हे शाळेतील व शाळेबाहेरील विद्यार्थ्यांना तसेच कार्पोरेट कंपन्यांना भाड्याने तासाला प्रति खेळाडू २०० ते ५०० रुपये प्रमाणे भाड्याने दिली जातात.मुळातच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोने घेतल्या त्या शेतकऱ्यांच्या स्थानिक गावातील मुलांना खेळण्यासाठी मैदानेच शिल्लक नाहीत.ठराविक वेळासाठी ही टर्फ भाड्याने घेतली जातात व याठिकाणी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत रात्री उशीरापर्यंत ही मैदाने भाड्याने दिली जातात. त्यामुळे शाळेच्या व या मैदानांच्या परिसरात राहणाऱ्या नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागतो. याबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात अनेकवेळा नागरीकांनी तक्रारीही केल्या आहेत. नवी मुंबईत शाळांची मैदाने कुलुपबंद करण्याच्या विरोधात शिवसेनेचे विठ्ठल मोरे यांना पालिका स्थापन झाल्यानंतर वाशी येथील एका संस्थेने कुलूपबंद केलेल्या मैदानाचे टाळे तोडून सर्वसामान्यांना मैदान खुले केले होते. आता तश्याच आंदोलनाची अपेक्षा असून मनसेचे संदेश डोंगरे यांनी या विरोधात आवाज उठवला आहे.

हेही वाचा >>>नवी मुंबई : फ्लॅटमधून गुटखा विक्री, विक्रेत्यावर कारवाई

फुटबॉल टर्फच्या माध्यमातून लाखोंचा मलिदा खाण्याचे काम राजरोसपणे हे शिक्षण संस्थाचालक करत आहेत. या फुटबॉल टर्फ वर दहा ते बारा तास फुटबॉल खेळण्याकरिता तासाला १८०० ते २००० रुपये इतके शुल्क हे शिक्षण संस्थाचालक बेकायदेशीरपणे आकारत आहेत. त्यातून दिवसाला १८००० ते २०००० रुपयांपर्यंत व महिन्याला जवळपास सहा ते आठ लाखांची कमाई हे शिक्षण संस्था चालक करत आहेत. सिडको बरोबर केलेल्या करारनाम्याचे हे सरळपणे उल्लंघन आहे. सिडकोने दिलेल्या या मैदानांचा व्यावसायिक वापर करण्याचा अधिकार शिक्षण संस्थांना नसल्याचे मनसेने दिलेल्या तक्रारपत्रात म्हटले आहे. तरी देखील हे खाजगी शिक्षण संस्था चालक मुजोरपणे ही खेळाची मैदाने बंदिस्त करून त्यावर काँक्रीटीकरण व कृत्रिम गावात लावून फुटबॉल टर्फ बनवत आहेत व त्रयस्थ संस्थांना भाडे तत्वावर देत आहेत. त्यामुळे स्थानिकांना व विद्यार्थ्यांना देखील या मैदानांचा वापर करता येत नाही. सिडकोकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सिडकोने या शिक्षण संस्थांना नोटीस जाहीर केल्या आहेत. या नोटीस मध्ये स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत कि येत्या १५ दिवसांत हे सर्व फुटबॉल टर्फ निष्कासित करण्यात यावेत. तसे न केल्यास सिडको आपला करारनामा रद्द करेल.

तिलक शाळेची मुजोरी……
नवी मुंबईतील अनेक शाळांना सिडकोने नोटीस पाठवली असून त्यामध्ये सीवूड् येथील मे.तिलक एज्युकेशन शाळेलाही नोटीस बजावली आहे. याशाळेच्या बाजुला असलेल्या मैदानावर नव्याने टर्फ बनवण्याचे काम मागील काही दिवसापासून सुरु आहे. सिडकोने शाळेला नोटीस बजावल्यानंतरही या ठिकाणी सुरु असलेले टर्फ निर्मितीचे काम वेगात सुरु असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा >>>आमदार निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ, चोरट्यांनी हिसकावला महिलेचा सोन्याचा हार

मैदानांबाबत मनसे आक्रमक …सिडको व्यवस्थापकीय संचालकांना कुंभकर्ण पुरस्कार देणार…टर्फ उखडून लावणार…
शाळांना सिडकोने मैदानावरील टर्फ हटवण्याबाबत १५ दिवसाची मुदत दिली असून जर मैदाने सिडकोने हटवली नाहीत.तर मनसे सिडको व्यवस्थापकीय संचालक व इतर अधिकाऱ्यांना कुंभकर्ण पुरस्कार देऊन त्यांच्या दालनात फुटबॉल खेळणार असून मुजोर शाळेचा टर्फ उखडून लावून शाळेच्या मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शाळेच्या वेळा व्यतिरिक्त मैदाने खुले आहेत असा फलक लावणार आहे.-गजानन काळे ,जिल्हाध्यक्ष मनसे, नवी मुंबई</p>

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 21:43 IST
Next Story
नवी मुंबई महोत्सवातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश ; सहभागी १४ राज्यांच्या संस्कृती, कला, परंपरेचे नवी मुंबईकरांना घडविले दर्शन