‘एनएमएसए’ला सिडकोची नोटीस

क्रीडा संकुलाची सदस्यसंख्या नऊ हजार ३०० असून सदस्यत्व शुल्क पाच ते २० लाख रुपयांपर्यंत आहे.

Cidco
संग्रहित छायाचित्र
वाशीतील एक एकर क्षेत्रफळाचा भूखंड मोकळा करण्याची नोटीस सिडकोने नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनला (एनएमएसए) बजावली आहे. भूखंड करारनाम्यानुसार सिडकोच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सवलतीच्या दरात असोशिएनचे सदस्यत्व न दिल्याने ही कारवाई केली जात आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी या भूखंडावर सराव मैदान तयार करण्यात आले होते. हे मैदान देशातील सर्वोत्तम मैदानांपैकी एक असल्याचा अभिप्राय क्रीडा संचालकांनी नुकताच दिला आहे. नवी मुंबई पालिकेला सार्वजनिक सुविधांसाठी हा भूखंड हवा असल्याचे या नोटिशीत सिडको नमूद केले आहे.

नवी मुंबई स्पोर्ट्स असोशिएशनचे क्रीडा सुंकल शहरातील सर्वात जुने असून त्याचे सदस्यत्व ही एक प्रतिष्ठेची बाब मानली जाते. क्रीडा संकुलाची सदस्यसंख्या नऊ हजार ३०० असून सदस्यत्व शुल्क पाच ते २० लाख रुपयांपर्यंत आहे. इथे विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. सदस्यांच्या निवास व्यवस्थेसह, अलिशान उपाहारगृहही येथे आहे. त्यामुळे सदस्यत्व मिळवण्याची धडपड अनेक उच्चभ्रू करतात.

सिडकोने ही जमीन या क्रीडा संकुलाला अतिशय नाममात्र दराने दिली आहे. असोसिएशन आणि सिडकोतील करानाम्यात सिडको कर्मचारी व अधिकाऱ्यांना या क्रीडा संकुलात सदस्यत्व देणे अनिवार्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या करारनाम्याचा आधार घेऊन ६२ कर्मचाऱ्यांनी सदस्यत्वासाठी अर्ज व सवलत शुल्क जमा केले आहे.  तरीही असोसिएशनच्या सभेत मंजुरी न दिल्याने हे कर्मचारी सुविधांचा लाभ घेऊ शकत नाहीत.

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी एनएमएसएने चार कोटी रुपये खर्च करून सराव मैदान तयार केले आहे. हे मैदान उभारण्यापूर्वी नवी मुंबई पालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते. त्या वेळी पालिकेने मूळ मालक सिडकोचे ना-हरकत प्रमाणपत्र आणण्याची अट घातली होती. एनएमएसएने सिडकोकडे या प्रमाणपत्राची मागणी केली असता त्यांना सिडको कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सदस्यत्वाची आठवण करून देण्यात आली.

एनएमएसएने ना-हरकत प्रमाणपत्राची वाट न पाहता क्रीडा मंत्रालयाच्या आदेशाने हे सराव मैदान तयार केले.

फिफा सामने संपल्याने सिडकोने आता या मैदानाचा ३५०० चौरस मीटरचा भूखंड परत मागितला आहे. एक महिन्यात हा भूखंड मोकळा करून द्यावा लागणार आहे. या भूखंडाचा भाडेकरार मार्च २०२० पर्यंत असून एनएमएसएने त्याचे शुल्क भरले आहे. स्पोर्ट्स असोशिएशनने करारनाम्यातील अटी व शर्तीचा भंग केल्याने हा भूखंड काढून घेण्यात येत असल्याचे या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

सिडकोने कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र क्रीडा संकुलाची व्यवस्था केलेली नाही. शहरात तयार होणाऱ्या क्रीडा संकुलात सवलतीत सदस्यत्व मिळावे ही रास्त अपेक्षा आहे. सदस्यांची मक्तेदारी राहावी, यासाठी सदस्यत्व शुल्क २० लाख रुपये केले आहे. ५० टक्के सवलत दिली तरी १० लाख रुपये सामान्य नागरिक भरू शकणार नाहीत. त्यामुळे सिडकोने दिलेली नोटीस योग्य आहे.

निलेश तांडेल, अध्यक्ष, सिडको कामगार संघटना, सीबीडी

चांगल्या सुविधांसाठी नूतनीकरण करावे लागते. नुकतेच तरणतलावावर एक कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे सदस्यत्व शुल्क वाढविले. यापूर्वी २५ हजारांत ७० टक्क सदस्यांना सदस्यत्व दिले आहे. आता जे शुल्क आहे. त्यात सवलत देऊन सदस्यत्व देण्याची तयारी आहे. फुटबॉल मैदान काढून घेण्याच्या कारवाईविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल.

डॉ. दिलीप राणे, उपाध्यक्ष, नवी मुंबई स्पोटर्स असोशिएशन, वाशी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cidco notice to nmsa

ताज्या बातम्या