‘उद्याच्या चांगल्या भविष्यासाठी आजपासूनच स्वच्छता’ महत्त्वाची असल्याचे सांगत देशात पहिल्या क्रमांकासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. सर्वानी एकत्रित काम करावे, असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी केले.
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ‘स्वच्छ भारत अभियाना’चा शुभारंभ करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
२ ऑक्टोबरच्या महात्मा गांधी जयंतीपासून केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान पुन्हा राबविण्याचे आदेश जारी केल्याने नवी मुंबई पालिकेने आपले देशातील तिसरे व राज्यातील पहिले स्वच्छ शहराचा मिळालेला सन्मान कायम राखण्यासाठी शुक्रवारपासून कंबर कसली आहे.
शहर स्वच्छ असणे म्हणजे येथील नागरी भागाप्रमाणेच गावे, झोपडपट्टी, औद्योगिक क्षेत्र असा प्रत्येक भाग स्वच्छ असणे गरजेचे आहे. याकरिता स्वच्छतेची चळवळ अधिक जोमाने उभी राहायला हवी, अशी अपेक्षा या वेळी आयुक्तांनी व्यक्त केली. शहराचा देशात पहिला नंबर येण्यासाठी कचऱ्याचे तीन प्रकारे जागेवरच वर्गीकरण करणे गरजेचे आहे.
या वेळी नवी मुंबई देशात सर्वात स्वच्छ शहर बनवू या.. यासाठी एक जिंगल प्रकाशित करण्यात आली. त्याचप्रमाणे ‘गाठू या शिखर स्वच्छतेचे’ हे पथनाटय़ सप्तश्री कला व सामाजिक संस्था यांच्या कलावंतानी सादर केले. या वेळी नवी मुंबईतील विविध ठिकाणच्या नागरिकांचे शहर स्वच्छतेविषयीचे अभिप्राय व अपेक्षा दर्शविणारी चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली.