स्वच्छता सर्वेक्षणात नवी मुंबई शहराने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे.असं असतांना राष्ट्रीय वायू गुणवत्ता निर्देशांक- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या निर्देशांक मूल्यातून नवी मुंबईची हवा ही अति खराब असून हवा गुणवत्ता निर्देशांक २६५ वर पोहोचला असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. नवी मुंबईच्या नवनियुक्त आयुक्तांकडे नवी मुंबई शहरातील हवा गुणवत्ता राखण्याचे आव्हान आहे. त्या अनुषंगाने विविध उपायोजना करण्यात येणार असून महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि एमआयडीसी यांच्याशी समन्वय साधून शहरातील हवा प्रदूषण कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.
हेही वाचा >>>पनवेल: कळंबोली-मुंब्रा महामार्गावरील कळंबोली उड्डाणपूलावर पडलेच खड्डेच खड्डे
नवी मुंबई शहरात एमआयडीसी लगत असलेल्या विभागांमध्ये रात्रीच्या वेळी उग्र वास येण्याचे प्रकार वाढत आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये तर या वासाचे प्रमाण अधिक वाढते. धुरक्यांचा आधार घेत एमआयडीसीतील कंपन्या हवेमध्ये दूषित वायू सोडून देतात. त्यामुळे वाशी, कोपरखैरणे, घणसोली, नेरूळ, तुर्भे इत्यादी विभागातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.त्याचबरोबर नवी मुंबई शहरात मोठया प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे ही हवेत धुळीचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे शहरातील हवा गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे.
हेही वाचा >>>जेएनपीसीटी बनले देशातील पाहिले ‘पीपीपी’ धोरण राबविणारे बंदर
हवा गुणवत्ता राखण्यासाठी शहरातील ज्या-ज्या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू आहे त्या-त्या ठिकाणी हिरवी कापडी जाळी लावणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त नार्वेकर यांनी दिली आहे. तसेच हवेतील धूलिकण कमी करण्यासाठी पाणी फवारणी मशीन घेण्यात येणार आहे.त्याचबरोबर एमआयडीसी मधून कंपन्यांमधून रासायनिक मिश्रित धूर हवेत सोडून दिला जातो. त्याबाबतही एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. यामधून एमआयडीसी आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला ज्या ठिकाणी हवेचे प्रदूषणात आहे, त्या ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासणी , पडताळणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका शहरातील हवा गुणवत्तेकडे ही कटाक्षाने लक्ष देणार असल्याची माहिती आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.