वाशीतील गणेश टॉवरच्या वाहनतळावर व्यावसायिक गाळे; पालिकेची नोटीस
वाशीतील पहिल्या पुनर्विकसित गणेश टॉवर या इमारतीला पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने नोटीस बजावली आहे. या इमारतीतील तीन वाहनतळावर व्यावसायिक गाळे काढण्यात आले आहे. तर एका व्यावसायिकाने गाळ्यात फेरफार करून जिना बांधला आहे. त्यामुळे चार ठिकाणी व्यापारी गाळ्यात अतिक्रमण झाले आहे. माजी उपमहापौर व माजी मंत्री गणेश नाईक यांचे निकटवर्तीय भरत नखाते यांचे घर या इमारतीत आहे. यापूर्वी पालिकेने बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांनाही त्यांच्या बंगल्यात झालेले अतिक्रम हटविण्याची नोटीस दिली होती.
नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात झालेल्या बेकायदा बांधकाम आणि अतिक्रमणावर हातोडा चालविण्याचे काम पालिकेने हाती घेतले असून त्यातून बडे प्रस्थ असलेल्या राजकीय नेत्यांची देखील सुटका झालेली नाही. याच साखळीत वाशी येथील सेक्टर एक मधील श्री गणेश कृपा को ऑप हाऊसिंग सोसायटीच्या गणेश टॉवर या शहरातील पहिल्या पुर्नविकसित इमारतीत काही अनिमियतता आढळून आली आहे. सत्तरच्या दशकात सिडकोने येथील १७६ रहिवाशांना येथील घरे विकली होती. त्यानंतर अस्तित्वात असलेला दीड एफएसआय घेऊन येथील रहिवाशांनी ह्य़ा इमारतींची पुर्नबांधणी केली. सुमारे सहा हजार ७०० चौरस मीटर असलेल्या या इमारतीची पुर्नबांधणी झाल्यानंतर रहिवाशांना मोठी घरे व काही गाळे उपलब्ध झाले. विकासकाने या गाळ्यांच्या विक्रीतून इमारत बांधणीचा खर्च वसुल केला. शहरातील अंत्यत मोक्याच्या या इमारतीतीतील तीन वाहनतळाच्या जागा हडप करण्यात आल्या असून त्या ठिकाणी व्यवसायिक गाळे बांधण्यात आल्याचा आरोप पालिकेने दिलेल्या नोटीसात आहे. त्याचप्रमाणे एका व्यवसायिकाने आपल्या दुकानातून पहिल्या मजल्यावर जिना काढलेला आहे. त्यामुळे पालिकेने ही नोटीस दिली आहे. एक महिन्यात हे अतिक्रम हटविण्यास पालिकेने सांगितले आहे. त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. बेकायदेशीर बांधकामे किंवा अतिक्रण केलेले नगरसेवक, लोकप्रतिनिधी, आणि नागरीकांना धडकी भरली आहे. आमदार मंदा म्हात्रे यांचे अतिक्रम हटविले जात असेल तर कोणाचीच गय केली जाणार नाही असा संदेश पालिकेने दिला आहे. म्हात्रे यांचे अतिक्रण हटविण्यात यावे यासाठी गेली एक वर्षे एक जनहित याचिकेद्वारे प्रयत्न केले जात होते. त्यामुळे आपण स्वत:हून हे अतिक्रम व बांधकामात केलेला बदल एक महिन्यात काढून टाकणार असल्याचे प्रतिज्ञापत्र म्हात्रे कुटुंबाने दिले होते. त्याचवेळी पालिकेने नोटीस दिल्याने शहरातील अतिक्रमण केलेल्या घटकांचे धाबे दणाणले आहेत. त्यात गणेश नाईक यांचा वरदहस्त असलेल्या गणेश टॉवर वर संक्रात आल्याने राजकीय प्रतिनिधींच्यात हलचल माजली आहे.

दोन अतिक्रणामुळे या टॉवरला नोटीस देण्यात आली असून अतिक्रमण हटविण्यास सांगण्यात आले आहे. एका दुकानात जिना काढण्यात आला आहे तर तीन वाहनतळाच्या जागा व्यवसायिक म्हणून वापर केलोजात आहे. या दोन कारणांनी नोटीस देण्यात आली आहे.
अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका

ही नोटीस कायदेशीर असून हे अतिक्रम हटविण्यास संबधित व्यावसायिकांना सांगण्यात आले आहे. त्यासाठी तीन महिन्याची मुदत पालिकेकडून मागून घेण्यात येणार आहे. वाहनतळांच्च्या जागेचा गैरवापर झालेला नाही.
भरत नखाते, रहिवाशी, गणेश टॉवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.