विकास महाडिक
महापालिकेच्या ‘अॅप’च्या माध्यमातून आढावा
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शहरातील नवीन कामांना खीळ बसलेली असली तरी नवी मुंबई पालिका क्षेत्रात सद्य:स्थितीत दोन हजार ९१ कामे सुरू असून निवडणूक निकालानंतर या कामात आणखी भर पडणार आहे. गेल्या दोन वर्षांत पालिकेने सहा हजार ३१९ नागरी कामांना सुरुवात केली आहे. सध्या सुरू असलेल्या या दोन हजार कामांवर पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पीटीएमएस अॅपच्या माध्यमातून आयुक्तांची बारीक नजर आहे.
२०११ पासून प्रलंबित असलेल्या काही कामांचा समावेश आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकारची संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महिनाभर नवीन कामे सुरू झालेली नाहीत. आचारसंहितेपूर्वी २२ नागरी कामांचा प्रारंभ करण्यात आला आहे. पालिकेने गेली नऊ वर्षे सुरू असलेल्या जुन्या कामांचा एक ताळेबंद तयार केला आहे. यात अभियांत्रिकी विभागातील विद्युत, अभियंता, पर्यावरण, पाणीपुरवठा या विभागांच्या कामांची जंत्री तयार करण्यात आली आहे. त्यानुसार पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या दोन वर्षांच्या काळात छोटी मोठी एकूण सहा हजार कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यातील दोन हजार ९१ कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.
२०११ मधील वाशी सेक्टर १४ मधील एका मंडईचे अर्धवट राहिलेले काम अद्याप सुरू आहे. याच वाशी सेक्टर चारमधील एक बहुउद्देशीय सभागृहाचे काम गेली पाच वर्षे रखडल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली असून येत्या सात दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
अशा प्रकारे शहरातील प्रगतीपथावर व प्रस्तावित अशा दोन्ही प्रकारच्या कामांवर सध्या पालिका अधिकारी काम करीत असून मुदतीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशस्तिपत्रक तर कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.
एक पीटीएमएस (प्राजेक्ट ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टीम) नावाचे अॅप तयार करण्यात आले असून यामुळे प्रकल्प कधी सुरू झाला, त्याला प्रशासकीय मंजुरी कधी मिळाली, नगरसेवकांनी त्यावर कधी मोहर उमटवली, त्यावरील खर्च, कंत्राटदार, निविदा प्रक्रिया, पूर्ण कधी होणार, सद्य:स्थिती ही संपूर्ण माहिती या अॅपमुळे आयुक्तांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना देखील मिळू शकत आहे.
शहरातील सर्व नागरी कामांचा लेखाजोखा एका क्लिकवर उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्या कामाची काय सद्य:स्थिती आहे, कोणता कंत्राटदार किती कामे करतो, याची माहिती उपलब्ध आहे. या सर्व कामांचा आढावा दर आठवडय़ाला घेतला जात असून उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक आणि वेळकाढूपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
– डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई पालिका