नवी मुंबईत आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. या विमानतळाचं भूमिपूजन नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं आणि लोकार्पण सोहळाही त्यांच्याच हस्ते पार पडला. यावेळी हे विमानतळ विकासासाठी कसं महत्त्वाचं आहे हे मोदींनी सांगितलं. शिवाय मुंबईचं महत्त्वही आपल्या भाषणात सांगितलं. इतकंच नाही तर २६/११ चा हल्ला झाला तेव्हा काय घडलं होतं? ती आठवणही त्यांनी भाषणात नमूद केली आणि काँग्रेसला सवाल केला.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मराठीतून भाषण केलं. विजयादशमी झाली, कोजागिरी पौर्णिमा झाली. आता दहा दिवसाने दिवाळी. तुम्हाला या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो, असं मोदी म्हणाले. त्यानंतर मोदी म्हणाले, आज मुंबईची दीर्घ प्रतिक्षा संपली. मुंबईला दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळालं आहे. हे एअरपोर्ट या क्षेत्राला आशियातील सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी ठरेल. मुंबईला आज अंडरग्राऊंड मेट्रो मिळाली. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सोपा होईल. विकसित भारताचं हे जिवंत प्रतीक आहे. मुंबईसारख्या वर्दळीच्या शहरात आणि ऐतिहासिक इमारतींच्या शहरात ही शानदार मेट्रो जमिनीतून तयार केली आहे. त्यासाठी मी काम करणारे कामगार आणि इंजिनियर यांचं अभिनंदन करतो, असे मोदी यांनी म्हटलं आहे.

२६/११ नंतर पाकवर हल्ला करण्यापासून लष्कराला कुणी रोखलं? -मोदी

मुंबई हे देशातलं महत्त्वाचं शहर आहे. त्यामुळेच २००८ मध्ये दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला करण्यासाठी मुंबईची निवड केली. त्यावेळी जे काँग्रेसचं सरकार होतं त्या सरकारने आम्ही सरकार म्हणून कमकुवत आहोत हे दाखवलं. दहशतवादापुढे गुडघे टेकले. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे एक बडे नेते, ज्यांनी देशाचं गृहमंत्रिपदही भुषवलं आहे, त्यांनी एका मुलाखतीत एक खुलासा केला. त्यांनी दावा केला की मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर आपली सैन्य दलं पाकिस्तानवर हल्ला करायला तयार होती. संपूर्ण देशाचीही भावनाही तीच होती. पण त्या ज्येष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या देशाच्या दबावामुळे त्यावेळी काँग्रेस सरकारने भारताच्या सैन्यदलांना पाकिस्तानवर हल्ला करु नका असं सांगितलं होतं. काँग्रेसला हे सांगावं लागेल की तो नेता कोण होता ज्याने दुसऱ्या देशाच्या दबावाखाली येऊन हा निर्णय घेतला. तो कोण नेता होता ज्याने मुंबईकर आणि देशवासीयांच्या भावनेशी खेळ केला, देशाला याचं उत्तर हवं आहे. काँग्रेसच्या या कमकुवतपणामुळे दहशतवाद्यांचं बळ वाढलं. ज्याची किंमत देशाला अनेकदा मोजावी लागली, आपले जवान शहीद झाले. असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंं आहे.

आपल्या सरकारसाठी लोकांची सुरक्षाच महत्त्वाची-मोदी

आपल्या सरकारसाठी देश आणि देशवासीय यांच्या सुरक्षेपेक्षा महत्त्वाचं काहीही नाही. आजचा भारत हा थेट उत्तर देतो. आजचा भारत घरात घुसून मारतो. जगाने ऑपरेशन सिंदूर दरम्यान हे सगळं पाहिलं आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.