बहुसदस्यीय पद्धतीचे शिवसेनेकडून स्वागत

नवी मुंबई : मुंबई वगळता इतर महापालिकांत निवडणुकीत बहुसदस्यीय पद्धतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. मात्र स्थानिक पातळीवर मात्र त्यांच्यात पक्षातील पदाधिकारी नाराज आहेत. या नव्या पद्धतीला नवी मुंबईत राष्ट्रवादी, काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. तर शिवसेनेकडून मात्र याचे स्वागत करण्यात आले आहे. भाजपच्या मते कोणतीही पद्धत आणा विजय आमचाच आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका करोनामुळे मागील दीड वर्षांपासून रखडल्या आहेत. एकीकडे महापालिका प्रशासनाने निवडणुकीची सर्व तयारी केली असून प्रभागरचनाही निश्चित झाली होती. त्यात हा नवा निर्णय घेण्यात आल्याने त्यांची सर्व तयारी वाया जाणार आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून राजकीय पक्षांनी आपली तयारी केली होती. यासाठी व्यूहरचनाही आखली होती. मात्र आता त्यांना नव्याने समीकरणे जुळवावी लागणार आहेत. त्यात पालिकेच्या इतिहासात प्रथम बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षातच नाराजी तर काहींसाठी फलदायी वातावरण असल्याचे मत विविध राजकीय पक्षांनी व्यक्त केले आहे.

ही नवी पद्धत कोणाच्या पथ्यावर पडेल तर कोणाला मारक ठरेल अशा चर्चा शहरात रंगू लागला आहेत. विविध पक्षांमध्येही मतांतरे असून हा निर्णय प्रत्यक्षात निवडणुका येईपर्यंत आघाडीची बिघाडी होईल असे चित्र शहरात निर्माण झाले आहे.

 शहरातील १११ प्रभागांचे फक्त ३७ बहुसदस्यीय प्रभाग होणार असल्याने अनेकांच्या  राजकीय डोवपेचांना सुरुंग लागणार असून पुन्हा नव्याने राजकीय समीकरणे आखावी लागणार आहेत. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत प्रमुख चार पक्षांत लढत होणार आहे.

हा निर्णय महाविकास आघाडीने घेतला असला तरी येथील स्थानिक राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांनी याला विरोध केला आहे. तर शिवसेनेने मात्र स्वागत केले आहे. भाजपही लढण्यास तयार आहे.  

बहुसदस्यीय पद्धतीपेक्षा एकसदस्यीय पद्धतीनेच निवडणुका व्हाव्यात ही आमची भूमिका होती. हा सरकारने घेतलेला निर्णय घेतला असला तरी स्थानिक व राजकीय पातळीवर एकाच पक्षाला याचा लाभ होऊ  शकतो असे वाटते. ही पद्धत त्रासदायक ठरणारी आहे.

अशोक गावडे, जिल्हाध्यक्ष, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस

राज्यातील सत्ताधारी व प्रशासक यांचे मिळून तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम सुरू आहे. महापालिकेतही तेच उद्योग सुरू असून एकसदस्यीय पद्धतीने किंवा बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका घ्या विजय भाजपचाच होणार आहे.

-रामचंद्र घरत, जिल्हाध्यक्ष, नवी मुंबई भाजप

बहुसदस्यीय पद्धतीचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय हा चांगला असून त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल. या पद्धतीमुळे बंडखोरीला आळा बसेल. त्यामुळे विजय आमचाच होईल, याची खात्री आहे.

  –विजय नाहटा, उपनेते, शिवसेना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय हा चुकीचा आहे. याला आमचा विरोध आहे. या पद्धतीमुळे राजकीय वादंग होतील. स्थानिक पातळीवर आम्हाला विचारात न घेतलेला हा निर्णय आहे. अनिल कौशिक,जिल्हाध्यक्ष,काँग्रेस