पादचाऱ्यांची गैरसोय व वाहतूक कोंडीवर उपाय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई</strong> : शहरातील वाशी- कोपरखैरणे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अखेर सेक्टर ९ ते १६ दरम्यान स्कायवॉक उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. ‘लोकसत्ता’ने ही समस्या वारंवार मांडत स्कायवॉकची गरज अधोरेखित केली होती.

नियोजित नवी मुंबई शहरात वाहतूक कोंडी ही समस्या गंभीर होत आहे. त्यात वाशी  ते कोपरखैरणे रस्त्यावर वाहनचालकांसह पादचारी वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत.  केवळ चार किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी या रस्त्यावर गर्दीच्या वेळी किमान ४० ते ४५ मिनिटे लागतात. सणांच्या दिवशी तर यापेक्षा अधिक वेळ लागत असतो. कधीकधी तर एक तास या वाहतूक कोंडीत जात आहे.

या  रस्त्यावर छोटी मार्केट असल्याने अनेक ठिकाणी ग्राहकांची सतत मोठी गर्दी होत असते. येणारे ग्राहक रस्त्यालगत नो पार्किंग असताना दुतर्फा वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असतो. याबरोबरच पादचारी बेशिस्तपणे रस्ता ओलांडत असतात. त्यामुळेही वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. त्यात या रस्त्यावर सहा सिग्नल असल्याने वाहतूक नेहमीच संथगतीने सुरू असते.

ही समस्या गेली अनेक वर्षे असून त्यात ती गंभीर होत आहे. त्यामुळे कोपरखैरणेतील हॉटेल वसिष्ठ , सेक्टर ७/१५चा नाका, वाशीतील सेक्टर ९/१६, वाशी प्लाझा आणि जुहूगाव अशा पाच ठिकाणी रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने या ठिकाणी स्कायवॉकची गरज असून तशी मागणी वाहतूक पोलिसांकडून वारंवार करण्यात आली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत होते.

वाहतूक पोलिसांची मागणी व ‘लोकसत्ता’ने ही समस्या वारंवार मांडल्यानंतर महापालिका प्रशासनाने याची दखल घेत वाशी येथे स्कायवाक उभारण्याचे ठरवले आहे. सेक्टर १६ पोलीस चौकी ते सेक्टर ९ दरम्यान स्कायवाक बांधण्यात येणार आहे. जेष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांची अडचण पाहता या स्कायवॉकला दोन्ही बाजूंनी उद्वाहन असणार आहे. हे काम सहा महिन्यात (जून अखेर) पर्यंत पूर्ण होणार आहे.

या ठिकाणच्या स्कायवॉकला मात्र काँग्रेस आणि भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे.

वारंवार होणारी वाहतूक कोंडी ही समस्या नागिरक व पादचाऱ्यांसह वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे.  वाहतूक पोलिसांनीही स्कायवॉक गरज व्यक्त केली होती. त्यानुसार सेक्टर १६ पोलीस चौकी ते सेक्टर ९ दरम्यान हे काम हाती घेतले आहे. अन्य काही ठिकाणी मागणी करण्यात आली असून त्याचेही सर्वेक्षण सुरू आहे.

– संजय देसाई, शहर अभियंता, महापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction of skywalk at vashi koparkhairane road zws
First published on: 28-01-2022 at 00:03 IST