नवी मुंबई: स्वतःच गाडीला धक्का मारून भांडण उकरून जबरदस्तीने फिर्यादी कडून पैसे घेणाऱ्या टोळीतील दुकालीस अटक करण्यात आली आहे. यातील दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
शाहरुख सिराज खान, अमरफ अब मान असे यातील आरोपीचे नाव आहे. नवी मुंबईत गेल्या काही आठवड्यापासून चालत्या गाडीला दुचाकीने धक्का मारून नुकसान भरपाई म्हणून पैसे घेणाऱ्या घटना वाढ होत आहे तसेच आता पर्यंत अशा पद्धतीच्या घटनांबाबत गुन्हेही नोंद झाली होती. २० मार्चलाही अशीच घटना संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली.
आणखी वाचा-अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्यांवर अखेर पोलिसांनीच केली कारवाई, १० डंपर जप्त
यातील फिर्यादी हे ऐरोली येथील एका कंपनीत मुलाखती साठी आपल्या कारने जात होते. ते ठाणे बेलापूर रस्त्यावर दिघा येथून जात असताना आरोपी दुचाकीवर आले व त्यांनी फिर्यादीच्या कारला धडक दिली. स्वतः आरोपींनी धडक दिली तरी आरोपींनीच धकड का दिली म्हणून वादावादी सुरू केली व मारण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. मात्र पैसे नसल्याचे फिर्यादीने सांगितल्याने त्याला गुगल पे वरून २० हजार विनय धनके या व्यक्तीच्या नावावर पाठवणे भाग पाडले. या बाबत रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
अशा पद्धतीने गुन्हे होण्याचे प्रमाण वाढल्याने सहाय्यक पोलीस आयुक्त डी . डी. टेळे यांच्या निर्देशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक शेळके, यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपींना कोपरखैरणे येथून जेरबंद केले. त्यांच्या अटकेनंतर केलेल्या चौकशीत त्यांच्या साथीदार रोहित पुजारी आणि विनय धनके यांचीही नावे समोर आली. या दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.