वजन वाढविण्यासाठी नवी मुंबईत कचऱ्यात माती; सिडको अधिकारी, कंत्राटदारांचे संगनमत
कचराभूमीपर्यंत कचरा वाहून नेणाऱ्या गाडय़ांना त्यातील कचऱ्याच्या वजनानुसार पैसे मिळतात हे लक्षात घेऊन कचऱ्यामध्ये माती टाकून त्याचे वजन वाढविण्याचे प्रकार पनवेलमध्ये सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून सुमारे दोन वर्षांत सिडकोची काही कोटी रुपयांची लूटमार करण्यात आली आहे. सिडकोतील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच हा घोटाळा सुरू असून, हे अधिकारी, कंत्राटदार, कचराभूमीचे व्यवस्थापक, रखवालदार, वजनकाटय़ावरील कर्मचारी अशी एक साखळीच यात कार्यरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सिडकोच्या कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल, खांदा कॉलनी या पाच वसाहतींमधील कचरापेटय़ांमध्ये गोळा होणारा कचरा कचराभूमीपर्यंत वाहून नेण्याचे काम सिडकोने ‘भारत विकास ग्रुप’ (बीव्हीजी) या कंपनीला दिले आहे. या कंपनीकडे संसद आणि राष्ट्रपती भवनाच्या स्वच्छतेचे कंत्राटही आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कचरा वाहून नेण्यासाठी सिडकोतर्फे प्रतिटन एक हजार ६० रुपये दिले जातात, तर माती वाहण्यासाठी प्रतिटन केवळ २०० रुपये दिले जातात. त्यामुळे कचऱ्यात माती टाकून वजन वाढविण्याचे काम केले जाते, असे सांगण्यात येते. कचराभूमीवरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार तेथे रोज या पाच वसाहतींतून सुमारे २५० टन कचरा आणला जातो. याचा अर्थ त्याच्या वाहतुकीसाठी सिडकोतर्फे रोज सुमारे दोन लाख ६५ हजार रुपये अदा केले जातात. विशेष म्हणजे या पाचही वसाहतींत रोज एवढा कचरा जमाच होत नसल्याचे येथील जाणकार सांगतात.
कचरा वाहतुकीत घोटाळ्याची शक्यता लक्षात घेऊन सिडकोने त्यावर देखरेख करण्याचे काम मिटकॉन या कंपनीकडे सोपविले आहे. त्यासाठी मिटकॉनला वर्षांला ७२ लाख रुपये दिले जातात. मात्र तरीही वजन फुगवण्याचे प्रकार घडतच आहेत. बीव्हीजी कंपनी, तसेच सिडकोने मात्र याचा स्पष्ट इन्कार केला आहे.
नागरिकांमुळे बिंग फुटले
कचरागाडय़ांमध्ये रोज माती कशी असते, असा प्रश्न काही जागरूक नागरिकांना पडला. त्यांनी ‘लोकसत्ता’च्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला इमारतींमध्ये घरे असणाऱ्यांनी कचरागाडय़ांवर पाळत ठेवली. काहींनी मातीमिश्रित कचऱ्याची छायाचित्रे, चित्रफीत काढली. त्यानंतर ज्या ठिकाणी कचऱ्यामध्ये माती मिसळली जाते ती ठिकाणे शोधली. त्या ठिकाणांचीही चित्रफीत तयार करण्यात आली. कचऱ्याच्या डम्परमध्ये जेसीबीच्या साहय़ाने मातीचे ढिगारे घालून त्यावर पुन्हा कचरा टाकून तो डम्पर तळोजा येथील नागरी घनकचरा व्यवस्थापनाच्या ष्टद्धr(२२४)छ्वप्रकल्पामध्ये नेला जातो. रोडपाली येथील नवीन एसटी आगाराच्या मागील बाजूस हे प्रकार केले जातात. या प्रकरणी कळंबोलीचे अधीक्षक अभियंता किरण फणसे यांना विचारले असता त्यांनी या सर्व गोष्टींचे खंडन केले.

नागरी घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पामध्ये मातीमिश्रित कचऱ्याची गाडी आल्यास ती गाडी परत पाठविली जाते. अशा किती गाडय़ा परत पाठविल्या याची नोंदवही प्रवेशद्वारावर ठेवण्यात आली आहे.
– ए. जे. खोब्रागडे, प्रकल्प नियंत्रक, सिडको नागरी घनकचरा व्यवस्थापन

*******
आमच्या कंपनीला अशा भ्रष्ट कारभारात रस नाही. काही महिन्यांपूर्वी कचरा वाहतुकीदरम्यान माती व कचरा भरलेल्या गाडीला तळोजा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून परत पाठविण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याची पुनरावृत्ती झालेली नाही.
– संग्राम सावंत, व्यवस्थापक, बीव्हीजी

*******

कचऱ्यात माती मिसळणाऱ्यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पकडून सिडकोला कळवले होते; मात्र त्यानंतर असे काहीच घडलेले नाही.
– आनंद सोनावणे, मिटकॉन कंपनी
*******

सिडको वसाहतींमध्ये कचरा घोटाळा होत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल, तसेच कचरा उचलणारी कंपनी यामध्ये दोषी आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई होऊ शकते.
– प्रज्ञा सरवदे, मुख्य दक्षता अधिकारी, सिडको

More Stories onसिडकोCidco
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crore rs of waste scam in cidco
First published on: 08-12-2015 at 03:45 IST