कळंबोलीतील सिडको आरोग्य केंद्राचा कारभार ‘रामभरोसे’
कळंबोली येथील सिडकोच्या आरोग्य केंद्रात दोन महिन्यांपासून रक्ताचे नमुने तपासणारे कर्मचारी नसल्याने रुग्णांना तपासणी अहवाल मिळण्यासाठी विलंब लागत आहे. रक्त तपासणीसांनी संघटना करून पुन्हा सिडकोकडे कायम स्वरूपी कामगाराचा हक्क मागू नये म्हणून सिडको या रक्त तपासणींना कंत्राटी पद्धतीने भरती करते. याच धोरणाचा फटका कळंबोली येथील सामान्य रूग्णांना बसला आहे.
कळंबोली वसाहतीमधील सूमारे दीड लाख रहिवाशांना या केंद्राचा लाभ झाला आहे. मागील तीन वर्षांपासून हे वैद्यकीय केंद्र गरीबांना या केंद्रातून माफक दरात उपचार होतात. परंतू या केंद्रातील रक्त तपासणीसांची पदे न भरल्यामुळे सिडकोचे आरोग्य विभाग इतर केंद्रातून येथील रूग्णांना रक्तदोष तपासणी करून देत आहे. त्यामुळे सहा तास मिळणारा रक्तदोषाचा अहवाल तब्बल दोन ते तीन दिवसांनी उशीराने मिळत आहे. या सर्व विलंबाच्या कारभाराला कळंबोलीतील शिवसेनेचे कार्यकर्ते आत्माराम कदम यांनी सिडकोचे सहव्यवस्थापकांच्या ध्यानात आणून दिला आहे.
नागरिकांची होणारी आरोग्य दिरंगाईबाबत लेखी पत्र कदम यांनी दिले आहे.
याविषयी सिडकोच्या आरोग्य विभागाकडून ७ एप्रील रोजी रक्त तपासणींसांची मुलाखत घेणार असून लवकरच सिडको नोडमध्ये रक्ततपासणीसांच्या ५ जागा भरल्या जातील असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. परंतू सलग १२ महिने लागणाऱ्या आरोग्य तांत्रिकांच्या जागा सिडकोने वर्षभरासाठी भराव्यात अशी अपेक्षा सामान्यांकडून व्यक्त होत आहे.