उरण : करोनाचा प्रार्दुभाव वाढू लागला असून करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सध्या करोनाग्रस्तांचे मृतदेह गावाठिकाणी अंत्यसंस्कारासाठी दिले जात आहेत. या प्रक्रियेसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले जात आहे. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून अशा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपकरणे देण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
राज्यातील वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे मृत्यूची संख्याही वाढली आहे. त्यामुळे सध्या करोनाबाधित व्यक्तींचे मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द केले जात आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गावातील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार केले जात आहेत. याकरिता येथील ग्रामपंचायत सदस्यांची मदत घेतली जात आहे. मात्र त्यांना करोनापासून बचाव करण्यासाठी पुरेशी सुरक्षा उपकरणे नाहीत. त्यामुळे त्यांना याची लागण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना विमाकवच देण्यात आलेले आहे तसे कवचही देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याकरिता ग्रामपंचायत व प्रशासनाने पुढाकार घेण्याची विनंती करण्यात आली आहे.
