२५० वाहने जप्त; पार्किंगसाठी उच्च दाब वाहिन्यांखालील भूखंड पालिका ताब्यात घेणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्षांनुवर्षे विनाकारण रस्ता अडवून ठेवणारी शहरातील २५० बेवारस वाहने नवी मुंबई महापालिकेने जप्त करून भंगारात काढली आहेत. या वाहनांची रवानगी तुर्भे येथील क्षेपणभूमीवर करण्यात आली आहे. अशा वाहनांची संख्या जास्त असल्याने ती ठेवण्यासाठी पालिकेकडे जागा नाही. वाहने जप्त करण्यापूर्वी पालिकेने या वाहनांवर रीतसर सात दिवसांत वाहन हटविण्याची नोटीस लावली होती, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने वाहने हटविण्यात आली आहेत.

मुख्य व अंतर्गत रस्त्याच्या कडेला गेली अनेक वर्षे ही वाहने उभी करून ठेवण्यात आली होती. त्यांच्या गर्दीमुळे अनेकदा अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि अन्य वाहनांच्या वाटेत अडथळा येत असे. राज्यातील नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत अल्पावधीत वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे. शहरी, ग्रामीण व झोपडपट्टी अशा तीन भागांनी व्यापलेल्या या शहरात वाहनतळ नसल्याने रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांची संख्या ५० हजारांच्या घरात गेली आहे. नवी मुंबईत दरडोई उत्पन्न १५ हजारांपर्यंत असल्याने सर्वसामान्य घरातही आज चारचाकी वाहन आहे. दुचाकी वाहनांचा तर या शहरात सुकाळ आहे. अनेक सोसायटय़ांत दुचाकी वाहनांसाठीही पार्किंगसाठी जागाच नाही. त्यामुळे सकाळ- संध्याकाळ पालिका रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी असतात. त्यावर उपाय म्हणून पालिकेने यापुढे बांधकाम परवानगी देताना पुरेशी पार्किंग व्यवस्था करण्याची अट घातली आहे.

सिडकोकडून वाहनतळासाठी बेलापूर, नेरुळ व वाशी येथे पाच भूखंड ठेवण्यात आले आहेत. वाशीत दोन ठिकाणी ई-पार्किंग सुरू करण्यात आले आहे. वाहन पार्क केल्यानंतर किती वेळ ते वाहन तिथे होते, त्यानुसार शुल्क आकारले जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरात सर्वत्र ई-पार्किंग सुरू केले जाणार आहे. त्यासाठी सिडकोकडून प्रत्येक नोडमध्ये भूखंड मागण्यात आले आहेत. यात सिडकोने उच्च दाबाच्या वाहिन्यांखाली सामाजिक संस्थांना वृक्षलागवडीसाठी भूखंड दिले आहेत. यातील बहुतेक भूखंडांचा गैरवापर केला जात असून चायनिज व्यवसाय, गोडाऊन, हॉटेल्स सुरू करण्यात आले आहेत. सिडको हे भूखंड पालिकेला देण्यास तयार असून पाच नोडमधील भूखंडांचे सर्वेक्षण झाले आहे. मात्र हे सर्व भूखंड एकाच वेळी घेण्यास पालिका तयार असल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

अल्पावधीत नवी मुंबईतील पार्किंगच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. त्यामुळे पालिकेने यावर उपाययोजजना करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यासाठी बहुमजली वाहनतळ उभारले जाणार असून ई-पार्किंगची सुविधा दिली जाणार आहे. टाटाच्या उच्च दाब वाहिन्यांखालील भूखंड ताब्यात घेऊन त्यावर एक तर सुशोभीकरण केले जाईल किंवा वाहनतळ तयार केले जातील.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disinherit vehicles in scrap
First published on: 21-01-2017 at 00:57 IST