दिवा गाव

ठाणे खाडीला खेटून वसलेले आणि चारही बाजूंनी खाडीच्या पाण्याने वेढलेले, पूर्वेला रबाळे, पश्चिमेला मुलुंड, दक्षिणेला ऐरोली आणि उत्तरेला गोठवली, तळवली या चार गावांच्या मध्ये वसलेले शे-दीडशे लोकवस्तीचे गाव म्हणजे दिवा गाव. पूर्वी गावाच्या पूर्वेस म्हणजे आत्ताच्या सेक्टर सहामध्ये चवदार टपोरी बोरं, जांभूळ, आंबे, करवंदे या रानमेव्याची मुबलक झाडे होती. दोन एकर जमिनीवर वसलेले हे गाव दोनशे एकरवर कधी विस्तारले ते कोणाला कळलेच नाही. मुलुंड-ऐरोली खाडीपूल याच दिवा गावाच्या भूमीत पूर्व बाजूस जोडला गेला आहे. त्यामुळे या पुलाच्या नावात दिवा नावाचा समावेश करण्यात यावा, असा आजही येथील भूमिपुत्रांचा आग्रह आहे. कधी काळी गुन्हेगारीमुळे कुप्रसिद्ध असलेल्या या गावात विठ्ठल-रुखमाईचे मंदिर झाले आणि गैरकृत्यांना आळा बसला, असे येथील ग्रामस्थ सांगतात.

या गावाचे वैशिष्टय़ म्हणजे पूर्वी गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती रेल्वेच्या सेवेत होती. त्यासाठी ते ठाण्याला पायी जात. तेथून नंतर कुल्र्यापर्यंत प्रवास करत. सर्वाधिक ग्रामस्थ रेल्वेत सेवेला असल्यामुळे रेल्वेचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले. ही ओळख आजही कायम आहे.

ठाणे जिल्ह्य़ात अनेक गावांची ‘दिवा’ अशी नावे आहेत. त्यात चेवनी दिवा, स्टेशन दिवा, अंजूर दिवा अशी काही नावे सांगता येतील. बेलापूर पट्टय़ातील राबाडा दिवा हे त्यापैकीच एक. केवळ शेती आणि मासेमारीवर अवलंबून राहिल्यास विकास होणार नाही हे ओळखून गावातील १००-१५० तरुणांनी त्या वेळी रेल्वेत गँगमन आणि इतर कुशल कामगारांच्या नोकऱ्या पत्करल्या. एकमेकांचे अनुकरण करत गावातील अनेक मुले रेल्वेच्या सेवेत रुजू झाली. गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक आजही रेल्वेच्या निवृत्तिवेतनावर उदरनिर्वाह करत आहेत, सन्मानाने जगत आहेत. देशातील पहिली रेल्वे ब्रिटिशांनी सीएसटी ते ठाणे दरम्यान सुरू केली. त्यामुळे ठाणे शहराच्या जवळ असल्यामुळे त्या काळात त्यांना रेल्वेत सहज नोकरी मिळाली. दिवा, ऐरोलीतील धाडसी तरुणांचा उपयोग रेल्वे मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी होत असे.

जिथल्या गुन्हेगारी कारवाया, वारंवार होणाऱ्या हाणामाऱ्या, खून यामुळे वेशीवरच रबाळे येथे पोलीस ठाणे सुरू करण्याची वेळ आली होती, त्याच दिवा गावातील मुले शिक्षणाकडे वळू लागली. ग्रामस्थांना रेल्वेची कायमस्वरूपी नोकरी मिळाल्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढय़ांचा शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आणि अनेकांनी पदवीपर्यंत मजल मारली. गुन्हेगारी कमी होत गेली. आजही रबाळे पोलीस ठाणे तिथेच आहे.   आता त्या पोलीस ठाण्यावर एमआयडीसीची जबाबदारी आहे.  सुरुवातीला गावात विठ्ठल-रुखमाई मंदिराची स्थापना झाली आणि गुन्हेगारी कमी झाली, मारुतीचे मंदिर बांधण्यात आल्यापासून साथीचे रोग दूर झाले, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. साठच्या दशकात ठाणे-बेलापूर मार्गावर आलेल्या फिलिप्स, भारत बिजली आणि सिमेन्स या कंपन्यांमध्ये येथील तरुणांना नोकरीची संधी मिळाली. काही जणांनी स्वयंरोजगार सुरू केले. त्यामुळे गावाची प्रगती झाली. सिमेन्सने तर गावासाठी काचेची शाळा (जी आज गावच्या वेशीवर सेक्टर सातमध्ये आहे) बांधून दिली. त्यापूर्वी ग्रामस्थांनी गावात श्रमदानाने विठ्ठल-रुखमाई मंदिराजवळ एक शाळा बांधली होती.

आत्ता खारफुटीचे जंगल झालेल्या मुलुंड-ऐरोली खाडीपुलावजळ पूर्वी सहज पायी जात येईल अशी वाळू होती, मात्र आज पुरुषभर चिखलाची दलदल झाली आहे. खाडीच्या पाण्यात सहज आंघोळ करणारे ग्रामस्थ आज या दूषित पाण्याला हात लावायलादेखील घाबरतात. मल्लखांब, कुस्ती, कबड्डी, लाठीकाठी, लेझिम हे या गावातील तरुणांचे आवडते खेळ. अजूनही ठणठणीत असलेले ७६ वर्षीय सखाराम मंगल्या पाटील त्या वेळी ठाण्याच्या कोळीवाडय़ात दामावस्तादने भरविलेल्या कुस्तीच्या फडाला आर्वजून हजेरी लावून भाग घेत.

गाव तंटामुक्त ठेवण्यासाठी पाच जणांचे ग्रामस्थ मंडळ न्यायनिवाडय़ाचे काम करत असे. गावातील होतकरू तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली सत्यनारायणाची पूजा आणि त्या निमित्ताने होणारा विद्यार्थ्यांचा गुणगौरव आजही नि:स्वार्थी भावनेने सुरू  आहे. शांताराम पोशा मढवी यांनी राजकीय पटलावर पहिले पाऊल टाकले. त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधी या गावात तयार झाले. गावाच्या तीन बाजूंना वनसंपदेचे अवशेष आजही काही प्रमाणात शिल्लक आहेत. निसर्गसंपदेमुळे चिंचोळी मैदान जिथे आता पालिकेचे उद्यान झाले आहे तिथे एक छोटे गाव होते. गाई, गुरे, शेळ्या यांचीही संख्या जास्त असल्याने खाडीकिनारी असलेल्या डोंगराळ भागात गुरुचरण जमिनी राखीव ठेवल्या गेल्या होत्या. दिवा गावात आमूलाग्र बदल झाला आहे. गाव हरवून गेले आहे. विठ्ठल-रुखमाई मंदिरात सप्ताह होतो. ग्रामस्थांच्या बैठय़ा घरांच्या जागी आता टोलेजंग इमारती आणि बंगले उभे राहिले आहेत. ग्रामस्थांच्या १० पट परप्रांतीय गर्दी झाली आहे. गावाचे गावपण टिकवून ठेवण्याचा गावातील सुशिक्षित तरुण आजही प्रयत्न करत आहेत.

सांस्कृतिक वारसा

* चैत्र महिन्यात होणाऱ्या जत्रेला अख्खे गाव एकत्र येत असे. त्या वेळी गावच्या चारही दिशांना मांसाहाराचा सातरा म्हणजे नैवेद्य ठेवण्याची प्रथा होती. त्यानंतर गावात कोणीही फिरत नसे. गावात येणाऱ्या भूत-पिशाच्चांना सातरा ठेवून बांधून ठेवता येते, असे मानले जात असे. गावजत्रेबरोबरच बेंबटय़ा चिंद्या मढवीच्या घरी होणारा गोकुळाष्टमीचा उत्सव गावाच्या एकोप्याचे दर्शन घडवत आसे.

* होळी हा ग्रामस्थांचा आवडता सण. पूर्वी हे मोजकेच सण एक गाव एक उत्सव याप्रमाणे होत होते. आज मात्र प्रत्येक भागात स्वतंत्रपणे उत्सव साजरे केले जात आहेत. गावातील खोत पाटील मढवी होते. पण नंतर अनेक बांधवांना सामावून घेतले गेले. खाडीला लागून असणाऱ्या या गावात गणेशोत्सव काळात विसर्जनाचा सोहळा पाहण्यासारखा असे. गावातील सर्व घरगुती गणपती एकाच वेळी विसर्जित होत. खोल समुद्रात गणरायाचे विसर्जन झाल्याची खूण दाखविल्यानंतरच एकाच वेळी प्रसाद वाटप केले जात होते.

* गावच्या रक्षणासाठी ग्रामदेव रात्री फिरतो हा इतर गावांप्रमाणे असलेला विश्वास याही गावात होता. ग्रामदेवतेबरोबरच नंतर दत्त मंदिर, भैरी मंदिर आहेत तर आत्ताच्या यश पॅराडाईज सोसायटीच्या मागे एक खामदेवाचे मंदिर आहे. खामदेव म्हणजे खाडीचा देव, खाडीत मासेमारी करायला जाण्यापूर्वी ह्य़ा देवाला नमस्कार केल्याशिवाय पुढे पाऊल टाकले जात नव्हते. भारुड, बाल्या नाच आणि एखादे गावातील मुलांचे नाटक हा या गावाचा सांस्कृतिक ठेवा.