उरणमध्ये विशेष मुलांना शिक्षण देणारी स्वीकार ही संस्था असून या संस्थेच्या मदतीसाठी येथील मुलामुलींनी विविध प्रकारचे दिवाळी साहित्य तयार केले आहे. हे साहित्य खरेदी करून संस्थेला मदत करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. या आकर्षक वस्तूंना विविध शाळांकडून वाढती मागणी असल्याने या मुलांमध्ये उत्साह संचारला आहे.
स्वामी ब्रह्मानंद संस्था उरण येथे विशेष मुलांची शाळा चालवीत आहे. या शाळेत मुले व मुली असून त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्यामधील कलाकार घडविण्याचा प्रयत्न संस्था करीत आहे. यामध्ये अगरबत्ती, सुगंधी उटणे, तोरणे, आहेर पाकिटेही ही मुले तयार करीत आहेत. सध्या सर्वानाच दिवाळीचे वेध लागले आहेत. दिवाळीसाठी विविध प्रकारच्या पणत्या व दिवे रंगविण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. सर्वसामान्य मुलेही रंगवू शकणार नाहीत त्यापेक्षाही उत्तम कलाकुसर या विशेष मुलांकडून होत आहे.
या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या वस्तू जास्तीत जास्त संख्येने खरेदी करण्याचे आवाहन संस्थेच्या संचालिका चारू शहा व शिरीष पुजारी यांनी केले आहे. या पणत्यांसाठी माधुरी उपाध्ये यांच्याशी ९३२१०३००४४ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.