किनाऱ्यावर भराव; प्रदूषणामुळे आवक घटली
मासेमारीवर उदरनिर्वाह चालविणाऱ्या उरण तालुक्यातील शेकडो पारंपरिक कुटुंबांवर ओल्यासोबत सुक्या मासळीची आवक घटल्याने आर्थिक मंदीची स्थिती उद्भवली आहे.
समुद्रात विकासाच्या नावाने होणारे मातीचे भराव व वाढत्या प्रदूषणामुळेही मासळीच्या प्रजननावरच संकट आल्याने शेकडो पारंपारिक मच्छीमार आर्थिक कोंडीत सापडले आहेत. प्रमाण घटल्याने सुक्या मासळीच्या दरात ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. याचा परिणाम व्यवसायावर व खवय्यांवरही जाणवू लागला आहे.
उरण तालुक्यातील करंजा व मोरा या दोन्ही बंदरात मिळून छोटय़ा मोठय़ा दोन हजारांच्या आसपास मच्छीमार बोटी आहेत. मोठय़ा मच्छीमार बोटींवरील खलाशी आणि मालक यांच्यातील टक्केवारीचा वाद चिघळल्याने बंदी उठल्यानंतरही नियमित मासेमारी सुरू झाली नसल्याची माहिती मोरा येथील मच्छीमार चंद्रकांत कोळी यांनी दिली आहे. दुसरीकडे उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर बंदर उभारणीसाठी मोठय़ा प्रमाणात समुद्रकिनाऱ्यावर व समुद्रात मातीचा भराव केला जात आहे. त्यामुळे खाडीकिनारी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांचे व्यवसाय बंद पडले आहेत. या व्यवसायिकांना त्यांची नुकसानभरपाई तसेच पर्यायी व्यवसाय देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पारंपरिक संघटनेचे अध्यक्ष सीताराम नाखवा यांनी केली आहे.सुक्या मासळीचे दर – बोंबील-३०० ते ४०० रुपये (नगावर आधारित दर), जवला-२०० ते २५० रुपये किलो, मोठा जवला (आंबार) ३०० ते ३५० रुपये किलो, वाकटी-२५० ते ३०० रुपये किलो, टेंगळी-२५० ते ३०० रुपये, कोळंबीचा सोडा -१२०० ते १५०० रुपये किला, बांगडा-५० ला तीन नग तर २०० रुपये डझन, माकोल-२०० ते २५० रुपये किलो, शिंगाली-२५० ते ३०० रुपये किलो, रिबन फिश (बला) २०० ते ३०० रुपये किलो झाले आहेत. खाडीकिनारी मिळणारे-कोळींब (लहान कोळंबी जीव) निवटय़ा, खरब्या, खुबे, कालवे अशा हंगामी मासळीचेही प्रमाण घटल्याने ४० ते ५० रुपयांना मिळणारे या मासळीचे वाटे व नग २०० रुपयांच्या घरात पोहचले आहेत. त्यामुळे खोल समुद्रातील खाडीकिनारीची तसेच हंगामात मिळणाऱ्या तिन्ही प्रकारांच्या मासळीची कमतरता जाणवू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2016 रोजी प्रकाशित
सुकी मासळी महाग
करंजा व मोरा या दोन्ही बंदरात मिळून छोटय़ा मोठय़ा दोन हजारांच्या आसपास मच्छीमार बोटी आहेत.
Written by जगदीश तांडेल
First published on: 15-01-2016 at 01:02 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dried fish expensive