मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर खुलेआम मद्यपान; पादचाऱ्यांना त्रास; पोलीस, उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष
नवी मुंबई शहरातील ‘छमछम’वर पोलिसांना अद्याप पूर्णत: नियंत्रण मिळवता आले नसताना शहरातील मद्यविक्री दुकानांबाहेर ‘खुले बार’ सुरू झाले आहेत. मद्यविक्री दुकानांबाहेर खुलेआम मद्यपान सुरू असताना आणि या दुकानांलगतच खाद्यपदार्थाचे बेकायदा स्टॉल्स सुरू झाले असताना स्थानिक पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पालिकेचा अतिक्रमण विभाग याकडे डोळेझाक करत आहे. मद्यविक्रेते आणि मद्यपींनी पोलिसांच्या दंडुक्याचाही धाक राहिला नसल्याचे चित्र शहरात गल्लोगल्ली सुरू असल्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात बेलापूर, नेरुळ, वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, ऐरोली, घणसोली, दिघा या पालिकेच्या विभाग कार्यालयांच्या हद्दीत मद्यविक्रीची दुकाने आहेत. त्यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नियंत्रण असते. दुकानाबाहेर बेकायदा मद्यविक्री वा मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा हक्क स्थानिक पोलिसांनाही असतो; परंतु सध्या पोलीस आणि उत्पादन शुल्क या दोन्ही विभागांकडून दुकानांबाहेर सुरू असलेल्या मद्यपानाकडे दुर्लक्ष केले जात आहे. काही दुकाने तर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असूनही तिथे दिवसाढवळ्या बिनदिक्कत मद्यपान केले जाते.
अनेक मद्यविक्री दुकानांच्या बाहेर मद्यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थाच्या बेकायदा गाडय़ा आहेत, मात्र पालिकेचा अतिक्रमण विभाग कोणतीही कारवाई करत नाही. काही मद्यविक्रीची दुकाने प्लास्टिकच्या ग्लासांचीही विक्री करून या वृत्तीला प्रोत्साहन देत आहेत. काही विक्रेते या बेकायदा स्टॉलचालकांकडून भाडेही वसूल करत आहेत. पालिका, पोलीस आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना हप्ते देऊन हे बेकायदा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा आहे. रात्री दुकानाबाहेरच्या बसथांब्यांवर, झाडाखाली तळीरामांची टोळकी जमत आहेत.
पादचाऱ्यांनी त्यांना हटकल्यास ते अर्वाच्य शिवीगाळ करतात. ठाणे जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागात एकूण ११ भाग असून नवी मुंबईतील एफ, ई, डी हे तीन विभाग बेलापूर ते दिघ्यापर्यंत कार्यरत आहेत. बारच्या तुलनेत या खुल्या बारमध्ये निम्म्या खर्चात मद्यपान करता येत असल्यामुळे आणि परिसरात खाद्यपदार्थ व अन्य सर्वच आवश्यक ‘सुविधा’ निर्माण करण्यात आल्यामुळे इथे होणारी गर्दी अधिक आहे.
विभागवार मद्यविक्रेते
बेलापूर ते सानपाडा
- दारू दुकाने – २२
- बीअर दुकाने – २९
वाशी ते कोपरखैरणे
- दारूची दुकाने – १४
- बीअरची दुकाने – १८
घणसोली ते दिघा आणि कळवा
- दारूची दुकाने – १०
- बीअरची दुकाने – १६
येथे संपर्क साधावा
- राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविक्री व इतर तक्रारींसाठी टोल फ्री नंबर दिला आहे. नागरिकांनी १८००८३३३३३३ या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कर्मचारी, वाहनांची कमतरता
- उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाकडे अत्यल्प कर्मचारी आहेत, तपासणीसाठी वाहनेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे कारवाई करण्यात अडथळे येतात, अशी माहिती ‘उत्पादन शुल्क’ ने दिली.
उत्पादन शुल्ककडे तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाते. संबंधित विभाग कारवाई करतो. पोलिसांकडूनही कारवाई व्हायला हवी. ज्या दुकानांबाहेर खुलेआम मद्यपान सुरू असते, त्या दुकानांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
– नाना पाटील, अधीक्षक, ठाणे जिल्हा उत्पादन शुल्क विभाग
मद्यविक्री दुकानाबाहेर पदपथ आणि रस्त्यांवर खुलेआम मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल. रस्त्यावर मद्यपानास प्रोत्साहन देणाऱ्या दुकानांवर उत्पादन शुल्क विभागानेही कारवाई करायला हवी.
– डॉ. सुधाकर पाठारे, उपायुक्त परिमंडळ-१