नवी मुंबई : नवी मुंबईत ड्रोन बंदी आदेश देण्यात आले आहेत. सागरी किनाऱ्यावर हे आदेश कायम असतात. मात्र पहलगाम येथील हल्ल्यानंतरची परिस्थिती पाहता सुरक्षा म्हणून ही बंदी आयुक्तालय क्षेत्रात घालण्यात आली आहे. या आदेशाचे काटेकोर पणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पहलगाम येथे झालेला अतिरेकी हल्ला आणि त्याला भारताने सडेतोड उत्तर दिल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान शस्त्रविराम आहे. मात्र सुरक्षाविषयक सतर्कता बाळगली जात आहे. आजच्या सॅटेलाईट तंत्रज्ञान काळात असे हल्ले करण्यास ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो त्यामुळे ठाणेपाठोपाठ नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन कॅमेराला बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा सागरी किनारा असून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ११० किलोमीटर सागरी किनारा आहे. यात ऐरोली ते वाशी- करावे एनआरआय, खारघर उरण ते घारापुरी लेणी हा परिसर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतो. या क्षेत्रात ड्रोन कॅमेरा बंदी कायम असते. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर पूर्ण पोलीस आयुक्तालंय क्षेत्रात ड्रोन कॅमेराला बंदी घालण्यात आली आहे.
काही अघटित घडू नये म्हणून ड्रोन बंदी घालण्यात आली आहे. खासगी समारंभ वा हौस म्हणून ड्रोन कॅमेराचा वापर केला जातो. मात्र त्यामुळे भीती आणि पाठोपाठ अफ़वा पसरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे ही बंदी घालण्यात येते. जर कोणी या आदेशाचे उलंघन केले तर कायाद्यानुसार गुन्हा नोंद करून कारवाई केली जाईल. – इंद्रजित करले, सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष शाखा