नवी मुंबई: नवी मुंबईतील रबाळे येथे अतिक्रमण विरोधी कारवाई करताना अनेक तृतीयपंथीय लोकांनी कारवाईचा विरोध केला. यावेळी मनपा अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करीत अश्लील हावभाव शिवीगाळही करण्यात आली. प्रकरण एवढ्यावर थांबले नाही तर पोलीस ठाण्यात त्यांना घेऊन गेल्यावर त्याही ठिकाणी हेच कृत्य त्यांनी केले. एका सहाय्यक पोलीस निरीक्षकावर त्यांनी हल्लाही केला. त्यामुळे पोलिसांनी पाच तृतीयपंथीय लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
अर्चना पथक, तिया नाईक, अक्षता गुरु, आकांक्षा पाटील, प्रिया त्रिपाठी असे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या तृतीयपंथीय लोकांची नावे आहेत.
रबाळे पोलीस ठाण्याच्या समोर मोकळा भूखंड आहे. याच ठिकाणी गेले काही महिन्यापासून अनेक तृतीयपंथीय लोकांनी अनधिकृत वस्ती बनवून राहतात. परिसरातील लोकांना त्यांचा त्रास होत होता. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या कडून जबरदस्तीने भीक मागणे मद्य पिऊन गोंधळ घालणे असे प्रकारही होत होते. याबाबत नवी मुंबई मनपाने अनधिकृत वस्तीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. त्या ठिकाणी तृतीयपंथीय लोकांचा कडाडधून विरोध होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेता पोलीस बळ सोबत घेण्यात आले होते.
नियोजनानुसार २८ तारखेला मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी, विभाग अधिकारी, आणि महिला व पुरुष असलेले पोलीस पथकही कारवाई करण्यास गेले असता त्यावेळी दहा ते बारा तृतीयपंथीय व्यक्तींनी मनपा अधिकाऱ्यांशी उर्मट आणि तीव्र शब्दात बोलणे सुरु केले शिवाय गोंधळ घालून पोलीस आणि मनपाच्या पथकातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत झटपटही केली. भर रस्त्यात अश्लील हावभाव करून अनेकांना जमवत रस्ता अडवून ठेवला. त्यातील अति गोंधळ घालणाऱ्या पाच जणांना महिला पोलिसांनी पकडून ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. त्याही ठिकाणी झटपट करीत गोंधळ घालणे सुरु केले.
तृतीयपंथीयांना समजावून सांगत असताना अचानक सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे यांच्या अंगावर तृतीयपंथीय धावून गेले. यात पाळदे यांना किरकोळ दुखापत झाली. संशयित आरोपींचा अभिलेख तपासाला असता त्यांच्या विरोधात यापूर्वीही गुन्हे नोंद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेवटी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ करणे, आदी कलमान्वये २९ तारखेला गुन्हा नोंद केला आहे. नियमानुसार संशयित पाचही आरोपींना नोटीस बजावण्यात आली आहे.