नवी मुंबई : पश्चिम महाराष्ट्राच्या नवी मुंबईतील रहिवाश्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या माथाडी कामगार मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आश्वासन देऊनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उपस्थित राहता आले नाही. त्यांची वाट पाहत ताटकळत बसलेले माथाडी कामगार आणि महिला आपली आसने सोडून घरी जाण्यासाठी निघू लागली. हे सर्व दृश्य पाहून भाषणासाठी उभे राहिलेल्या माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना आपल्या भावना अनावर झाल्या. भाषण सुरू असतानाच त्यांना त्यांचे हुंदके आवरता आले नाहीत. नरेंद्र पाटील यांना या अवस्थेत पाहून उपस्थितांनाही गहिवरून आले.
माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगार मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले होते. परंतु, यावेळी केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच उपस्थित राहता आले. मात्र, राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री मंत्री एकनाथ शिंदे यांनी माथाडी कामगारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधावा या भावनेतून नरेंद्र पाटील यांनी पुन्हा एकदा एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात माथाडी कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. एकनाथ शिंदे या मेळाव्याला यावेत म्हणून नरेंद्र पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत होते.
हा मेळावा आधी बुधवारी (२९ ऑक्टोबर) निश्चित करण्यात आला होता. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार असल्याने याची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर गुरुवारी (३० ऑक्टोबर) या मेळाव्याचे आयोजन निश्चित करून सर्वांना निमंत्रित करण्यात आले. गुरुवारी सकाळी आंबेडकर चळवळीतले दिवंगत नेते रा.सु. गवई यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी एकनाथ शिंदे हे अमरावतीला जाणार असल्याने परंपरेनुसार सकाळच्या सत्रात होणार कामगार मेळावा दुपारी ४ च्या नंतर घेण्याचे ठरले. त्यानुसार ५ वाजताची वेळ देत सर्व माथाडी कामगार आणि मान्यवरांना कार्यक्रम स्थळी बोलावण्यात आले होते.
मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अमरावतीवरून मुंबईला येण्यासाठी संध्याकाळचे साडेसहा वाजले. त्यांनतर नागपूर येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित बैठकीला शेतकरी नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक असल्या कारणाने राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही तिथे उपस्थित राहणे गरजेचे असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुंबई विमानतळावरून थेट सह्याद्री अतिथीगृह गाठले.
या दरम्यान, संध्याकाळी ५ वाजल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वाट पाहत बसलेल्या माथाडी कामगारांचा मात्र संयम सुटत चालला होता. दिवसभर बाजार समितीत कष्ट केल्यानंतर संध्याकाळी आपल्या घरी जाण्यासाठी कामगार व्याकुळ झाले होते. अखेर, एकनाथ शिंदे यांना उशीर होणार हे कळताच महिला कामगारांनी आपले घर गाठण्यासाठी तिथून निघण्याचा निर्णय घेतला. बघता बघता महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या खुर्च्या रिकाम्या होऊ लागल्या. अशात काही माथाडी कामगारांनीही तिथून निघण्याचा निर्णय घेतला.
अशा परिस्थितीत माथाडी कामगारांना थोपवण्यासाठी नरेंद्र पाटील यांनी सूत्रे हाती घेतली आणि माथाडी कामगारांना भावनिक साद घातली. यावेळी भाषण करते वेळी “मी कोणालाही सभागृह सोडण्यापासून अडवणार नाही, परंतु, मी दिलेल्या शब्दाप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आपला शब्द पाळतील असा माझा विश्वास आहे. त्यामुळे ते येतील अशी आशा बाळगून मी शेवटच्या क्षणापर्यंत थांबून राहीन” असे म्हणत आपला निर्धार व्यक्त केला. मात्र, या भाषणादरम्यान नरेंद्र पाटलांना आपल्या भावना आवरणे शक्य झाले नाही. बोलताना अधूनमधून त्यांचे हुंदके उपस्थितांच्या कानावर पडत होते. शेवटी नरेंद्र पाटील यांना भावनिक झालेले पाहून उपस्थितांनाही गहिवरून आले.
शेवटी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या मेळाव्याला उपस्थित राहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कटिबद्ध असल्याचे आश्वासन देत कार्यक्रमाचा समारोप केला.
माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न :
नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या माथाडी कामगारांच्या गरजेपोटी बांधकाम करण्यात आलेल्या घरांचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. ही गाजरेपोटी बांधलेली घरे महापालिकेने नियमित करावीत आणि कोणत्याही घरांवर कारवाई करून नये अशी माथाडी कामगारांची मागणी आहे. तसेच नवी मुंबईतील सिडकोच्या घरांमध्ये माथाडी कामगारांना असलेले ५ टक्के आरक्षणही वाढवण्यात यावे अशीही मागणी माथाडी कामगारांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भातील आपल्या भावना नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा कामगार मेळावा मोठा दुवा ठरला असता. परंतु, आपल्या नियोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहू न शकल्याने माथाडी कामगार आणि नरेंद्र पाटील यांचा हिरमोड झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते.
