रात्र रस्त्यावर; सोमवारी पहाटेपासून आठ तास वीज गायब
नवी मुंबई : सोमवारी पहाटे कोपरखरणेत वीजपुरवठा खंडित झाला होता, तो पूर्ववत होण्यास सकाळी दहा वाजले. सिडकोकालीन जुन्या वीजवाहिन्या, नादुरुस्त वीजपेटय़ा आणि कंत्राटदाराचे दुर्लक्ष या तिहेरी वीजसमस्येत नवी मुंबईतील कोपरखरणे, घणसोली व ऐरोली हा परिसर अडकला आहे. त्यामुळे या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. कोपरखरणेत तर हे नेहमीचेच झाल्याने रहिवासी संतापले आहेत. वीज नसल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे.
या परिसरात सध्या विजेची गंभीर समस्या झाली आहे. या बाबत महावितरणला वारंवार सांगूनही ती दूर न झाल्याने नागरिकांनी अनेक वेळा आंदोलनही केली आहेत. मात्र परिस्थितीत काही बदल होताना दिसत नाही. अलीकडेच कोपरखैरणे सेक्टर १९चा रात्रभर विद्युतपुरवठा खंडित झाल्याने संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयात जाऊन संताप व्यक्त केला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने जमाव शांत झाला होता. मात्र वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना काही कमी झालेल्या नाहीत.
सोमवारी पहाटे साडेतीनच्या दरम्यान बोनकोडे येथील वीजवाहिनीत बिघाड झाल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला होता. मात्र नेमका कुठे बिघाड झाला हे समजण्यातच महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सकाळचे आठ वाजले. त्यानंतर जोडाजोड करून वीज आली. सेक्टर ९, १०, १२ डी तसेच बोनकोडे व खैरणे गावात वीज नसल्याने नागरिकांचा जीव कासावीस झाला होता. महावितरणकडून वीजवाहिनी नवीन टाकण्यात येत असून यापुढे असे होणार नाही, असे कनिष्ठ अभियंता एस.डी.काटकर यांनी दिली.
ऐरोलीत वीज नसल्याने पाणी नाही
सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ऐरोली सेक्टर ५ येथील पाण्याच्या टाकीजवळ रोहित्रामध्ये ट्रिप झाल्याने वीज गायब झाली. परिणामी सकाळी या परिसराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सुमारे एक ते दीड तास वीज आली नव्हती. एका तासात विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात आला, असे कनिष्ठ अभियंता एस.आर.शिंदे यांनी सांगितले.