उद्योजक : राजा भुजले

महापे येथील सॉवरेन टेकया कंपनीने सांडपाणी प्रक्रियेत केलेल्या नवनवीन प्रयोगांमुळे नवी मुंबई शहराचे नाव भारताबरोबर विदेशातही पोहचले आहे. त्यांच्या या प्रवासात विविध अडचणी, आव्हाने उभी राहिली. पण केवळ नवसंशोधनाच्या विचारांनी पछाडलेल्या उद्योजक राजा भुजले यांनी स्वत:च्या इच्छाशक्तीवर हे सहज साध्य केले आहे.

अभियांत्रिकी क्षेत्रात नक्कल न करता काही जगावेगळे करण्याचा ध्यास बाळगून निर्माण करण्यात आलेल्या सॉवरेन टेक या महापे येथील कंपनीने सांडपाणी प्रक्रियेत नवनवीन प्रयोग करण्याचे ठरविले आहे. त्याचमुळे आज जर्मनीबरोबर जर्मन वॉटर पाटर्नरशिप ते काश्मीरमधील दल लेक शुद्धीकरण मोहीम उघडण्यात ‘सॉवरेन टेक’ आघाडीवर आहे. येथील हाऊस बोटमधील सांडपाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा उभी करण्याचे काम सॉवरेन टेककडे आहे.

तब्बल १५-१६ वर्षांपूर्वी चार अभियंत्यांनी एकत्र येऊन सॉवरेनची मुहूत४मेढ रोवली. त्यातील कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्राध्यापक राजा भुजले यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात होणारी कॉपी न करता जगाला लागणाऱ्या नवीन संशोधन शोधून काढण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी जगातील अभियांत्रिकी संशोधनाचा अभ्यास केला गेला. यातून नवीन काहीतरी निर्माण करण्याची संकल्पना पुढे आली. त्सुनामी अथवा भूकंप जगात का घडतात, याची कारणमिमांसा नंतर केली जात. पण त्यांची पूर्वकल्पना शोधून काढण्यात मनुष्य अद्याप अपयशी ठरला आहे. म्हणून यावर संशोधन होणे गरजेचे आहे. समस्याच्या मुळाशी गेल्यावर अनेक प्रश्नांची उत्तरे सापडत असल्याचे भुजले यांनी स्पष्ट केले. पिण्याच्या पाण्याचे जगातील महत्त्व सर्वज्ञात आहे. तिसरे महायुध्द हे पाण्यावरून होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पाणी हेच जीवन आहे. त्यामुळे ते जपून वापरण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पुन्हा पुन्हा वापरता येण्यासारखे आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एकही एकत्रित सांडपाणी प्रक्रिया केंद्र नाही. पण त्याचवेळी नवी मुंबईत सिडको व पालिकेने सात एकत्रित सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारली आहेत. नवी मुंबई पालिकेला राज्यात पहिला आणि देशात आठवा स्वच्छ शहरांचा मिळालेला मान यात या सांडपाणी केंद्राचा मोठा वाटा आहे. प्रत्येक लोकवस्तीतून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया होणे आवश्यक आहे. नव्हे ती काळाजी गरज ओळखून सॉवरेनटेकने तशी यंत्रणा विकसित केलेली आहे. त्यामुळे मोठय़ा शहरातील सांडपाण्यासह एखाद्या सोसायटीतील सांडपाण्यावरदेखील प्रक्रिया करून त्याचा पुर्नवापर करता येण्यासारखा आहे. अभियंत्यानी असे काही तरी करावे यासाठी भुजले यांनी मुंबई विद्यापिठातील प्राध्यापकीवर पाणी सोडले आणि या क्षेत्रात संशोधन सुरू केले. देशातील पाणी प्रदूषणावर उपाय तोकडे पडत आहेत. त्यासाठी यंत्रणा उभी करण्याची जबाबदारी सॉवरेन टेकने स्वीकारली आहे. अशुद्ध पाण्यातील जीवजंतू यांचा नाश करण्यासाठी पाणी शुद्धीकरणाचे मॉडेस्ट सेटअप उभारली जात आहे. सांडपाण्यातील सर्व मल, माती, वेगळी करुन ते पिण्याजोगे करता येत आहे.

काश्मीरमध्ये सध्या नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपैकी दल लेकचे अशुद्धीकरण ही एक समस्या आहे. हाऊस बोटमध्ये निर्माण होणारे सांडपाणी, मल यांची विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा या हाऊस बोट मालकांनी गेल्या अनेक वर्षांत उभारलेली नाही. त्यामुळे देशी विदेशी र्पयटक या दुर्गधीमुळे हाऊस बोटमध्ये राहणे पसंत करीत नाहीत. यावर उपाय म्हणून काही हाऊस बोट मालकांनी सॉवरेन टेकची सांडपाणी शुद्ध यंत्रणा बसवून घेतली आहे. त्यामुळे सांडपाणी किंवा मल लेकमध्ये न जाता त्यावर प्रक्रिया करून ते पाणी हाऊस बोटमधील नर्सरीसाठी वापर केला जातो. सॉवरेनच्या महापे येथील मुख्यालयातही अशाच प्रकारे छोटी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे या मुख्यालयात त्या पाण्यावर वाढविण्यात आलेली हिरवाई अनेकांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. चार अभियंत्याच्या संकलप्नेवर निर्माण झालेल्या सॉवरेनटेक मध्ये आता २४ पेक्षा जास्त अभियंता काम करीत असून ७० कुशल कामगार कार्यरत आहेत. पाण्याचे महत्व जगात पटवून देण्यासाठी जर्मन वॉटर पार्टनरशिप सॉवरेन टेकबरोबर सामंजस्य करार केला आहे. पाणी शुद्धीकरणाच्या या कामाबरोबरच सॉवरेनटेक अ‍ॅटोमोटिव्ह, स्टील, कॉपर या क्षेत्रातही कार्यरत आहे. आता पाणी क्षेत्रात ठोस उपाययोजना करण्यासाठी सॉवरेनने कंबर कसली आहे.