मिसळीची मक्तेदारी ही तशी झणझणीत-तिखट प्रदेशातील. म्हणजे ढोबळमानाने पश्चिम महाराष्ट्र. लाल मिरच्यांचा वापर अधिक म्हणून त्याला तशी चवही वेगळी. आता महाराष्ट्रात कुठे ना कुठे, कुठला ना कुठला तरी पदार्थ ‘स्थलांतरित’ होऊन म्हणा वा बल्लवांनी स्वनिर्मिती केलेला म्हणा तसा चवीचा वेगळा अवतार धारण करतोच. मिसळ तशी नागपुरातही मिळते आणि ती झणझणीतच असते, पण सध्या पश्चिम महाराष्ट्राचाच विचार करू या. म्हणजे पुणेरी मिसळचा.

पुणेरी मिसळीची चव चाखण्यासाठी पुण्यात जाऊनच खा, असे सांगण्याचा जमाना मागे पडलाय. इतकी व्यापकता खाद्यपदार्थ आणि खाणाऱ्यांमध्ये आली आहे. पुणेरी चव चाखायला मिळत आहे ऐरोलीतील सेक्टर- ४ मधील छोटेखानी असलेल्या चैतन्य उपाहारगृहात.

कोल्हापुरी मिसळ, नाशिक मिसळ अशा वर्गवारीत पुणेरी मिसळची लज्जतही कायम आहे. तिखट मसाला पुण्यातील चवीचे खास आकर्षण. त्यामुळे येथील पदार्थ ठसकेबाज आहेत. मूळच्या पुण्यातील खेडेगावात राहणाऱ्या रत्नप्रभा गवांदे आणि कांचन गवांदे यांनी काही वर्षांपूर्वी मुंबई गाठली तेव्हा त्यांना खाद्यपदार्थ बनविण्याच्या क्षेत्रात पाऊल टाकू, अशी पुसटशी कल्पनाही नव्हती. कुटुंबाची आर्थिक गरज भागविण्यासाठी दोघींनी मिळून जेवणाचे डबे बनविण्यास सुरुवात केली. गावी सणा-समारंभात स्वयंपाक बनविण्याचा मोठा अनुभव गाठीशी असल्यामुळे यात अडचण आली नाही. त्यामुळे हळूहळू त्यांनी स्नॅक्सच्या क्षेत्रात पावले टाकली. यात त्यांनी मिसळ-पाव ही खासियत बनवली. चटकदार, स्वस्त आणि तत्काळ मिळणारे अन्न म्हणून मिसळीकडे अनेकांची पावले आपसूक वळतात. त्यामुळे गवांदे कुटुंबीयांनी छोटेखानी मिसळ-पावचे उपाहारगृह चालू केले. मिसळमध्ये चिवडा, मोड आलेली कडधान्ये यांचा वापर करण्यात येतो. रश्शाच्या चवीवर मिसळीचा दर्जा ठरतो. गवांदे कुटुंबाला शेतकरी कुटुंबाचा वारसा असल्याने गावी घरी धान्ये, कडधान्ये यांची चंगळ असते. मिसळमध्ये वापरली जाणारी कडधान्ये, मसाला हे सगळे घरगुती असल्याने मिसळीची किंमतही परवडेल अशी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्राहक वर्ग मिळतो की नाही हाही प्रश्न त्यांच्यापुढे होताच; परंतु एक प्रयोग म्हणून त्यांनी आरंभ केला. ग्राहकांची या मिसळ-पावला सध्या पसंती आहे. अस्सल पुणेरी लालसर झणझणीत रस्सा पाहताच येथे अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. घरगुती कडधान्यांबरोबर मिसळीत वापरली जाणारी शेवही त्या स्वत: घरी बनवतात. घरगुती पुणेरी मिसळीसाठी परिसरातील लोकांच्या रांगा लागत आहेत. पुणे जिल्ह्य़ातील नागरिक खासकरून येथे मोठय़ा प्रमाणात गर्दी करतात. त्याचबरोबर ज्येष्ठ मंडळी पुणेरी ठसका अनुभवण्यासाठी आवर्जून रांगा लावतात.

जेवण करण्याची भारी हौस असल्यामुळे कुटुंबाच्या घरखर्चाला हातभार लावता येईल आणि अन्नसेवाही मिळेल असा विचार करून मिसळ-पावचा छोटेखानी उद्योग सुरू केल्याचे गवांदे यांनी सांगितले.

मिसळ कुठे?

  • चैतन्य उपाहारगृह, सेक्टर- ४, जी- १०, ऐरोली.
  • वेळ – सकाळी १० ते दुपारी २.