आपल्या जीवनातून कला, संस्कृती वजा केली तर माणूसपणच राहणार नाही हे ओळखून आपण मायबोली मराठीचा गोडवा जाणून घ्यायला हवा आणि आपल्या मराठी भाषेत अभिमानाने बोलले पाहिजे असे सांगत सुप्रसिध्द कवी प्रा. अशोक बागवे यांनी ‘माझ्या मराठीचा बोल, वाजे काळजात खोल, ओवीमधून पाझरे, निळ्या अमृताची ओल’ ही कविता आपल्या अनोख्या गायन शैलीत सादर करून मराठीचा जागर केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिन’निमित्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंतीदिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘मायबोली मराठी’ या व्याख्यानाप्रसंगी मराठी भाषेची थोरवी वर्णन करत मराठी भाषेचा आग्रह धरला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी कविवर्य प्रा. अशोक बागवे यांच्यासह महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे मंचावर उपस्थित होते. महानगरपालिकेचे विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांनी भरगच्च भरलेल्या ॲम्फीथिएटरमध्ये प्रा. अशोक बागवे यांच्या वक्तृत्वाचा झरा भरभरून वाहत होता.
हेही वाचा >>>नवी मुंबई : दारू पिऊन धिंगाणा घालणारा पोलीस कर्मचारी अखेर निलंबित
आपण उगाचच मराठी भाषेविषयी न्यूनगंड बाळगतो, त्यामुळे आपल्याला मराठीचे ऐश्वर्य कळत नाही. म्हणूनच कोणत्याही भाषेचा व्देष न करता आपल्या मायबोलीचा लौकीक वाढविण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी सांगितले. मराठी भाषेतील विविध शब्दांची अनेक उदाहरणे देत बागवे सरांनी भाषेची गंमत उलगडवून दाखविली.
भाषा नसती तर माणूस पशू झाला असता त्यामुळे माणसाचे माणूसपण ज्या भाषेमुळे व्यक्त होते अशा मातृभाषेचा अभिमान आपण बाळगला पाहिजे असे सांगत त्यांनी ‘दया, क्षमा, शांती’ हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे बोधवाक्य आहे असे उलगडवून दाखविले. कवी हा समाजाला दिशा देण्याचे काम करीत असतो त्यामुळे कवितेशी आईच्या अंगाईपासून, लहानपणीच्या बडबड गीतांपासून जुळलेली नाळ आपण पुढेही कायम राखली पाहिजे असेही ते म्हणाले.
हेही वाचा >>>नवी मुंबई : अधिक उत्पादन, उठाव कमी असल्याने कांद्याच्या दरात घसरण
‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीतामधील कविवर्य राजा बढे यांचे ओजस्वी शब्द अंगात स्फूर्ती निर्माण करतात असे सांगत प्रा. अशोक बागवे यांनी या गीताचा इतिहासही उलगडवून दाखविला.याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगत नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध उपक्रम आयोजित करीत असल्याची माहिती देत आपल्या मराठी भाषेच्या सामर्थ्याचे सर्वांनी एकत्र येऊन कौतुक करायला हवे यादृष्टीने आजचा कार्यक्रम महत्वाचा असल्याचे सांगितले. आपल्या मनोगतात आयुक्तांनी मराठी भाषेचा आरंभापासूनचा विकसनशील प्रवास कथन करीत परिवर्तनाचे फार मोठे काम या सर्व साहित्यिक सरस्वतीपुत्रांनी केले आहे असे म्हटले. मराठी भाषेचा इतिहास व परंपरा सांगत आयुक्त नार्वेकर यांनी आपल्या भाषेला समृध्द करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने सक्रिय योगदान द्यावे असेही आवाहन केले.
कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन करीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. मराठी भाषेचा जागर करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी तसेच नवी मुंबईतील साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा केला.