रायगड जिल्हा हा भात शेतीसाठी व मिठागरांसाठी प्रसिध्द होता.यामध्ये उरणला भाताचे कोठार संबोधले जात होते.मात्र मागील तीस वर्षांत शेतीचा भात पिकां ऐवजी जमीनींचा वापर उद्योग निर्मिती तसेच घर बांधणीसाठी होऊ लागल्याने भाताचे कोठार रिते होऊ लागले आहे.मागील वर्षी उरण तालुक्यातील पूर्व विभागात शिल्लक असलेल्या भातशेती पैकी २६०० हेक्टर जमीनीवर पिक घेण्यात आलेले होते.यावर्षीत त्यात घट होऊन २४६० हेक्टर जमीनीवरच पिक घेतले गेल्याची माहीती तालुका कृषी विभागाने दिली आहे.सततची नापिकी,बेभरोसी उत्पादन यामुळेही शेतीकडे पाठ फिरविली असली तरी शिल्लक शेतीतही शेतकऱ्यांचा राबता सुरू असून पेरणीची कामे पूर्ण झाल्याने सध्या शेतकऱ्यांना पावसाची आस लागली आहे.

देशात कसेल त्याची जमीनी यासाठी झालेल्या कुळकायद्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी जगातील पहिला शेती न पिकविता शेतकरी संपा केला.अशा उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बहुतांशी जमीनी या समुद्र किनाऱ्यालगत व खार परिसरातील आहेत. खारेपाटातील शेती ही एकपिकी व मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेली शेती आहे.प्रचंड मेहनत करून येथील शेतकरी शेती पिकतो,भातशेतीवरील उत्पन्नावरच येथील अनेक पिढी वाढल्या शिकल्या आणि पुढे गेल्या.मात्र उरण सारखा तालुका मुंबई व नवीमुंबई सारख्या नव्याने विकसित होणाऱ्या शहरा लगत आहे.त्यामुळे शेती ऐवजी नागरीकरण व औद्योगिकरणासाठी येथील जमीनींचा वापर होऊ लागला आहे.

भातशेती घटत असली तरी शेतकऱ्यांनी शेती पिकविण्याची हिंमत सोडलेली नाही. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून उरण मधील शेतकऱ्यांसाठी बांधावर खत योजने अंतर्गत ३० टन खताचे वाटप केले जात असल्याची माहीती उरणचे तालुका कृषी अधिकारी के.एस.वसावे यांनी दिली आहे.पावसाळा जवळ आल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून खत,बियाणे व औषधे असे तीन हजार रूपयांचे आत्मा या कृषी योजनेचे पॅकेज दिले जात असल्याचीही माहीती त्यांनी दिली.

४३ वर्षांंपूर्वी शासनाने सिडकोच्या माध्यमातून उरण तालुक्यातील पश्चिम विभागातील बहूतांशी जमीन संपादीत केली आहे.त्यामुळे पश्चिम विभागात सध्या शेतीच शिल्लक नाही. तर पूर्व विभागात शिल्लक असलेल्या शेतीवर जेएनपीटी बंदराच्या उभारणीनंतर गोदामे तसेच बंदरावर आधारीत तत्सम उद्योगांची उभारणी होत असल्याने शेत जमीनी कमी होत आहेत.तर यात सिडकोने या परिसरात नव्याने नैना प्रकल्प जाहीर केला आहे.त्यामुळे येत्या काळात शेतीत आणखी घट होणार आहे.