३५० वाहनांपैकी २८० दुचाकी; बुलेटला सर्वाधिक मागणी, वाढत्या वाहतूक कोंडीवरील उपाय
बडय़ा शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून दुचाकी वाहन खरेदीची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी मुंबई आरटीओ कार्यालयात नोंद होणाऱ्या ३५० वाहनांमध्ये चक्क २८० दुचाकी वाहनांचा समावेश आहे. यात बुलेटला जास्त पंसती दिली जात असून त्यांची संख्या ६० पर्यंत आहे.
सध्या बांधकाम क्षेत्रात असणाऱ्या आर्थिक मंदीमुळे अनेक सवलतींचा वर्षांव करूनही ग्राहकांचा घर आरक्षणाकडे म्हणावा तसा कल नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अशा वेळी वाहन खरेदी करण्याची हौस मात्र कमी झाली नसून ती वाढली आहे. त्यामुळे एका घरात चार पाच दुचाकी आणि एक दोन चार चाकी उभ्या असल्याचे दृश्य आता सर्रास झाले आहे. त्यामुळे शहरी भागात पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून अधिकची वाहने रस्त्यावर येऊ लागली आहेत. सोसायटीतील दुचाकी वाहनांच्या पार्किंगवरून कुरबुरी वाढू लागल्या आहेत. ग्रामीण भागात तर दुचाकी वाहनांचा धुरळा उडवणाऱ्यांची संख्याही सर्वाधिक आहे. शहरी भागातील वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यात पाचवीला पुजले जाणारे खड्डे पाहता अनेकांनी दुचाकी वाहनांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यात अॅटोमॅटिक स्टार्ट होणाऱ्या बुलेटची क्रेझ पुन्हा आली असून इनफिल्ड बुलेटची किक मारण्यास करावे लागणारे दिव्य पाहता ह्य़ा वाहनांपासून तरुणाई चार हात लांब राहात होती. मात्र सहज सरू होणाऱ्या बुलेटमुळे ती खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे अनेक विक्रेते मान्य करीत आहेत. सैराटमध्ये आर्चीने चालविलेली बुलेट अनेकांच्या मनात बसली असून ती घेण्याकडे कल वाढला आहे. याशिवाय स्त्री-पुरुषांना सहज चालविता येणाऱ्या अॅक्टिव्हा प्रकारातील दुचाकी वाहनांना मागणी वाढली आहे. अलीकडे मोनॉसस्पेशन असलेल्या दुचाकींना पसंती आहे. त्यामुळे नवी मुंबई प्रादेशिक कार्यालयात दसऱ्याच्या मुहूर्तावर ३५० वाहनांची नोंदणी होणार असून त्यात २८० दुचाकी आहेत तर चारचाकी वाहने ७० आहेत. चांगल्या क्रमांकासाठी चार पट शुल्क मोजून वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यात बेटली, जग्वार, बीएमडब्लू, ऑडी या वाहनांची संख्या बोटावर मोजण्याइतकी असली तरी नवी मुंबईत सर्वाधिक आलिशान गाडय़ांची नोंद झालेली आहे.
आज आरटीओ कार्यालय सुरू
दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करणाऱ्या अनेकांना वाहनांची नोंद करता यावी यासाठी वाशी येथील आरटीओ कार्यालय सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मंगळवारी सुरू राहणार आहे.
दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्याकडे जास्त कल आहे. त्यामुळे मंगळवारसाठी ३५० वाहनांची नोंदणी होणार असून यात दुचाकी वाहनांची संख्या जास्त आहे.
–संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई
सध्या बुलेट, अॅक्टिव्हा या वाहनांना जास्त मागणी आहे. तरुणांची स्पोर्टस दुचाकींना जास्त पसंती आहे. कर्जाचे हप्ते काही प्रमाणात कमी झाल्याने दुचाकी खरेदी वाढली आहे.
–जीतू सिंग, दुचाकी विक्रेता, कोपरखैरणे