राज्य सरकारने २५ वर्षांपूर्वी नवी मुंबई पालिकेत समाविष्ट केलेली जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील (दहिसर मोरी भागातील) ती १४ गावे नंतर ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे १५ वर्षांपूर्वी वगळण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला होता. पण त्याच ग्रामस्थांच्या आग्रहाखातर अखेर ती १४ गावे मंगळवारी नवी मुंबई पालिकेत अधिकृतरीत्या समावेश करण्यात आली. तसा अध्यादेश नगरविकास विभागाने सोमवारी काढला आहे. ठाणे जिल्हा परिषद मध्ये असलेल्या या गावांचा मागील १५ वर्षात योग्य तो विकास न झाल्याने ग्रामस्थांनी ही गावे नवी मुंबई पालिकेत पुन्हा समाविष्ट करण्यात यावीत असे साकडे तत्कालीन नगरविकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सहा महिन्यांपूर्वी घातले होते. ती मागणी त्यांनी या अध्यादेशाद्वारे मान्य केली आहे.

हेही वाचा… उरण : करंजा मध्ये पावसामुळे घराची भिंत कोसळून तिघे जखमी

नवी मुंबई पालिका क्षेत्र २९ गावे ४९ झोपडपट्टी वसाहती आणि १० सिडको वसाहतीचे आहे. या क्षेत्रात राज्य शासनाने १९९४ मध्ये कोणत्याही पालिकेला जवळ नसलेली शहरापासून दुर्लक्षित आणि नवी मुंबईशी भौगोलिक दृष्ट्या संलग्न नसलेल्या दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू , नावाली वाकलण, बमारली नारीवली, बाले, नागावं, भांडरली, उत्तरशिव, गोटेघर अश्या १४ गावांचा समावेश नवी मुंबई पालिकेत करण्यात आला. पालिकेनेही या गावासाठी नळ योजना, रस्ते अशा काही पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली होती. या भागातून १९९५ व २००० या दोन पालिका निवडणुकीत २ नगरसेवक निवडूनही आले होते. मात्र २००५ च्या पालिका निवडणुकीत येथील ग्रामस्थांनी ‘पालिका हटाव’ चा नारा सुरू केला. पालिकेने लागू केलेला मालमत्ता कर आणि येथील शासकीय जमीन पालिका ताब्यात घेणार या भीतीने ग्रामस्थांचा हा विरोध टोकाचा होता. त्यांनी पालिकेवर आणलेल्या मोर्चात मुख्यालयावर दगडफेक केली तर येथील नेत्यांच्या नावाने शिमगा करण्यात आला. पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय १४ गाव संघर्ष समितीने जाहीर केला. त्यामुळे निवडणुकीचा अर्ज भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका माजी नगरसेवकाचे घर पेटवण्यात आले.

हेही वाचा… नवी मुंबई : ऐन पावसाळ्यात विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोठया प्रमाणात हिंसाचार आणि विरोध वाढू लागल्याने राज्य शासनाने जून २००७ मध्ये ही गावे पालिकेतून वगळण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यावेळी ग्रामस्थ शांत झाले मात्र या गावांना समाविष्ट करून घेण्यास ठाणे कल्याण डोंबिवली या जवळच्या महापालिका तयार झाल्या नाहीत. त्यानंतर या गावांचा विकास खुंटला, मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे वाढली. सरकारची या भागात ८०० एकर जमीन आहे. त्यातील शेकडो एकर जमीन हडप करण्यात आली आहे. गुन्हेगारी वाढली आहे जातीयवाद फोफावला आहे. अनेक संघटित टोळ्यांचे आश्रयस्थान ही गावे झाली आहेत बांगलादेशी घुसखोर वाढले आहेत. ग्रामस्थांना आता जगणं मुश्कील झालं आहे. या गावांना कोणी वाली नाही. जिल्हा परिषदेचा निधी तुटपुंजा आहे. अनेक समस्या निर्माण झालेल्या असल्याने १४ गावातील काही पुरोगामी ग्रामस्थांनी झालं गेलं विसरून जा म्हणत परत नवी मुंबई पालिकेत येण्याची इच्छा व्यक्त केली, त्यासाठी ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले. आमदार गणेश नाईक माजी आमदार सुभाष भोईर यांच्या प्रयत्नाने शिंदे यांनी त्या १४ गावातील सुमारे तीन हजार ग्रामस्थांना नवी मुंबई पालिकेत सामावून घेण्याची सहा महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या निर्णयाची मंगळवारी अंमलबजावणी करण्यात आली.