उरण : खराब हवामानामुळे गेल्या सहा दिवसांपासून उरणच्या करंजा मच्छीमार बंदरातील मासेमारी बंद आहे. तर पुढील आणखी चार दिवसही धोक्याचे आहेत. त्यामुळे करंजा बंदरातील जवळपास २५ ते ३० कोटींच्या निर्यात व्यवसायावर याचा परिणाम झाला आहे. याच बंदरातून दिवसाला किमान अडीच कोटींच्या मासळीची उलाढाल होत होती. तीही आज ठप्प झाली आहे. याचा परिणाम येत्या काळात मासळीचे किरकोळ दरवाढीतही होण्याची शक्यता आहे.

करंजा बंदर हे देशातील सर्वात मोठे मासळी निर्यातीचे हब बनू पाहात आहे. यात अरबी समुद्रात पकडलेल्या रिबन फिश, कटल, माकोल, नळ, कुपा, बांगडा आदी प्रकारच्या मासळीची निर्यात युरोप, थायलंड, व्हिएतनाम, हाँगकाँग,सिंगापूर, मिडल ईस्ट या जगातील विविध भागात पोहचली आहे. १५ ऑगस्ट २०२४ पासून करंजा मच्छीमार बंदरातून मासळी विक्री सुरू झाली आहे. पहिल्या दोन महिन्यांच्या कालावधीत बंदरातून ५० कोटींच्या ५०० टन मासळीची निर्यात झाली होती. आता हा आकडा ५०० कोटींच्या पार गेला असल्याची माहिती निर्यातदारांनी दिली आहे.

ही मासळी अमेरिका,चीन, थायलंड तसेच आशिया व युरोप खंडातील अनेक देशांत निर्यात करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मासळी बंदर आणि त्यावर आधारित विविध प्रकल्पांमुळे करंजा परिसरात विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या लघुउद्योगांत वाढ झाली आहे. त्यामुळे बंदरातील ४०० मासेमारी बोटी, त्यावर आधारित २ हजार कुटुंबांना लाभ झाला आहे.
यांत्रिक साहित्याला विदेशातून मागणी

मच्छीमारांच्या शेकडो बोटी मासळी उतरविणे, विक्रीसाठी मुंबईतील एकमेव ससूनडॉक बंदराच्या आश्रयाला जात होत्या. त्यामुळे ससूनडॉक बंदरावरील वाढता ताण लक्षात घेऊनच करंजा येथेच उपयुक्त जागेत सुमारे ३०० कोटी खर्चाचे एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे अद्यावत करंजा मच्छीमार बंदर उभारण्यात आले आहे. या आधीच मच्छीमारांसाठी आवश्यक लागणारे साहित्य पुरविण्यासाठी जाळी, रंग, सामानपुरवठा करणारे हार्डवेअर, २०-२५ वर्कशॉप्स, जाळींची दुकाने आहेत. करंजा येथून काही वर्कशॉप्समध्ये तयार करण्यात येणारे मच्छीमार बोटींसाठी लागणारे पंखे, टनट्युब, सॉफ्ट आदी यांत्रिक साहित्याला थेट विदेशातून मोठी मागणी आहे.

करंजा मच्छीमार बंदरावर आधारित उद्योग म्हणून येथील स्थानिक तरुणांनी मासळी निर्यातीचा व्यवसाय सुरू केला आहे. या माध्यमातून निर्यातदारांसाठी मासळी परदेशी पाठविण्यात येत आहे. मात्र खराब हवामानामुळे व्यत्यय आला असून आर्थिक नुकसान झाले आहे. मासेमारीसाठी खर्च करण्यात आलेले तीन लाख रुपये वाया गेले असून नव्या फेरीसाठी पुन्हा एकदा जादाचा खर्च करावा लागणार आहे. गणेश नाखवा, निर्यातदार, करंजा.