पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावामुळे पनवेल शहरासह अनेक गावांना आणि सिडकोच्या वसाहतींना पुराचा धोका निर्माण झाला आहे. सोमवारच्या अतिवृष्टीमध्ये गव्हाण फाटा येथे पळस्पे ते जेएनपीटी या राष्ट्रीय महामार्गावर साचलेल्या दिड फुट पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणा-या पावसामुळे विमानतळाजवळील गावांमध्ये राहणा-या ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. मंगळवारी दुपारी डुंगी गावात उंब-यापर्यंत पाणी साचण्यास सुरूवात झाली होती. १० गावांतील ग्रामस्थांप्रमाणे पुनर्वसनाचे पॅकेज विमानतळबाधित गावक-यांना मिळावे आणि गावक-यांचे सूखरूप स्थलांतर सूरक्षित जागेवर करावे ही मुख्य मागणी या ग्रामस्थांकडून केली जात आहे.

सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी पहिल्या टप्यात १० गावांचे पुनर्वसन केले. पनवेल तालुक्यातील चिंचपाडा, कोळी/कोल्ही, कोपर, उलवे, वरचे ओवले, ओवले-कोम्बडभुजे, वाघिवली/वाघिवलीवाडा, गणेशपुरी, तरघर या गावानंतर पारगाव-डुंगी या गावांचे सुद्धा भागाक्षेत्रालगत असल्याने पुनर्वसन करण्याचा निर्णय सिडकोने घेतला. आजही पुनर्वसन प्रक्रिया पुर्ण न झाल्याने डुंगी गावात ७० कुटूंब आणि पारगाव येथे पाचशे कुटूंब येथे वास्तव्य करतात.

खाडी किनारपट्टी पारगावपासून एक किलोमीटर अंतरावर असली तरी डुंगी गावक-यांचे डोळे प्रत्येक पावसात ढगाकडे लागतात. सिडकोच्या अभियांत्रिकी विभागाने डुंगी गावालगत पावसाळी पाणी गावात थेट शिरू नये म्हणून धारणतलावाची निर्मिती गावालगत केली. मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत या धारणतलाव तुडूंब भरल्याने तलावाबाहेर पाणी जाण्यास सुरूवात झाल्याचे या गावचे माजी सरपंच विकास नाईक यांनी सांगीतले. तसेच दुपारी एक वाजेपर्यंत अनेक घरांच्या उंबरठ्यापर्यंत पाणी साचण्यास सुरूवात झाल्याने ग्रामस्थांनी पुरसदृष्यस्थितीपासून वाचण्यासाठी त्यांच्या घरातील सामान वरच्या बाजूला ठेवण्याची सुरूवात केली होती.

मागील दोन वर्षांपूर्वी डुंगी गावात अतिवृष्टीत कंबरेभर पाणी साचत होते. मात्र सिडकोने येथे मोटारपंपाच्या साह्याने पाणी उपसा करण्याची सोय ठेवल्याने गेल्या तीन दिवसाच्या सततच्या पावसात घरात पाणी शिरले नाही. मात्र मोटारपंपांची क्षमता वाढविण्याची मागणी माजी उपसरपंच नाईक यांनी केली आहे. विमानतळाचा भराव गावालगत झाल्याने पाण्याचा निचरा ज्यापद्धतीने होणे गरजेचे आहे तसे होताना दिसत नसल्याने गावक-यांची चिंता वाढली आहे.

डुंगी गावच्या ग्रामस्थांनी मागील अनेक वर्षांपासून सिडकोकडे पुनर्वसन पॅकेज सूधारीत देण्याची मागणी केली आहे. २०१९ साली सिडकोने डुंगी गावच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला मात्र २०२१ साली सिडकोने केलेल्या सर्वेक्षणानंतरही २०१३ नंतरही घरांची बांधकामे अपात्र ठरविली जात असल्याने गावकरी नाराज आहेत. गावक-यांनी बांधलेल्या घरांच्या बांधकामांची पात्रता निश्चित करावी, डुंगीवासियांच्या या मुख्य मागणीकडे सिडकोकडून दुर्लक्ष होत आहे. दापोली ग्रामपंचायतीचे सरपंच निकिता समाधान घोपरकर यांनी दिलेल्या माहितीनूसार दापोली गाव परिसरात जोरदार पाऊस असला तरी पूरसदृष्य स्थितीप्रमाणे गावातील कोणत्याही घरात मंगळवारी दुपारपर्यंत पाणी शिरण्याची एकही घटना घडली नाही.

गेल्या महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या कामाची प्रगती पाहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विमानतळ प्रकल्प ठिकाणी आल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विमानतळामध्ये तीस-या धावपट्टीसाठी अजून दापोली, पारगाव, कुंडेवहाळ, भंगारपाडा या गावांचे भूसंपादन करण्यासाठीचा निर्णय घोषित केला. अद्याप या गावक-यांना संपादनाबाबत शासनाने कोणत्याही नोटीस पाठविल्या नाहीत. मात्र राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार नक्की करावा मात्र जागतिक हवामान बदलाच्या संकटाचा सर्वात मोठा परिणाम विकसित पनवेलच्या परिसरावर होण्याची भिती पर्यावरणवाद्यांकडून व्यक्त केली जात आहे. पाणथळी, कांदळवन आणि शेती नष्ट करुन येथे शहर वसविली जात आहेत.

नदीपात्राचे नैसर्गिक कमी करून त्याला नाल्याचे अरुंद रुप दिले जात आहे. नदीपात्रात दळणवळणाचे जाळे उभारण्यासाठी कॉंक्रीटच्या भिंती (पिल्लर) उभारले जात आहे. यामुळे नैसर्गिक पाण्याचा निचरा होणारी ठिकाणी कमी झाली. याचा फटका पनवेलमध्ये अवकाळी आणि मोसमाच्या पर्जन्यवृष्टीमध्ये कमालीचे बदल मागील तीन वर्षात झाले आहेत. कमी वेळेत जास्तीचा पाऊस ही नवी समस्या निर्माण झाली आहे. पावसाळी पाणी निचरा होण्याच्या वाटेतील अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनाचा एकमेकांशी समन्वय नसल्याचे अनेकदा पाहायला मिळत आहे. पनवेलचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास होत असताना हा विकास पर्यावरण शास्त्राप्रमाणे करण्याची मागणी पर्यावरणवाद्यांकडून होत आहे.