नवी मुंबई: ऑनलाईन जुगार हा प्रकार तरुण वर्गात लोकप्रिय होत आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी याकडे आपला मोर्चा वळवला असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार नवी मुंबईत घडला आहे.
ऑनलाईन जुगारात जिंकलेले पैसे मिळवण्यासाठी आगाऊ रक्कम भरण्यास सांगून २ कोटी ७४ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सोमवारी सायबर पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील कोपरखैरणेत राहणाऱ्या एका व्यक्तीला ऑनलाईन गेमिंग जुगार खेळणे महागात पडले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये सहज म्हणून ऑनलाईन गेमिंग जुगार सँट स्पोर्टस (SAT SPORTS ) साईटवर खेळणे फिर्यादी यांनी सुरु केले. सुरवातीला चांगल्या पैकी रक्कम जिंकत असल्याने त्यांनी खेळणे सुरु ठेवले. यात तीन पत्ती, कॅसिनो असे विविध खेळाचा समावेश होता.
कालांतराने यात जिंकलेली रक्कम देण्यास टाळाटाळ सुरु झाली. जिंकलेली रक्कम हवी असेल तर आगाऊ रक्कम विविध कर सांगून त्यांच्या कडून डिसेंबर २०२२ ते २०२५ मे दरम्यान संपर्कात असणाऱ्या तीन संशयित व्यक्तींनी सांगितलेल्या बँक खात्यात ३ कोटी २४ लाख ८४ हजार ५२६ रुपये फिर्यादी यांनी भरले. त्या पैकी ५० लाख रुपये फिर्यादी यांच्या खात्यात जमा करण्यात आले मात्र उर्वरित रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून अनोळखी तीन व्यक्तीच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.