उरण शहर तसेच तालुक्यात पाणी चोरी आणि गळतीकडे पाणी वाटप करणाऱ्या आस्थापनांकडून दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. उरणमधील अनेक ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना लागलेल्या गळतीमुळेही रस्त्यात पाणी वाया जात आहे. तर पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांतूनही पाण्याची चोरीही केली जात आहे. याकडे आस्थापनासह, शासकीय यंत्रणांचेही दुर्लक्ष असल्याने दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उरण तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांच्या वर गेली आहे. तर औद्योगिकदृष्टया उरण तालुक्याचा विस्तार होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन पाण्याची तसेच उद्योगांसाठी मोठय़ा प्रमाणात लागणाऱ्या पाण्यासाठी पाणी कमी पडू लागले आहे. असे असले तरी उरण परिसरात एम.आय.डी.सी.चे रानसई धरण, रायगड जिल्हा परिषदेच्या लघु पाठबंधारे विभागाचे पुनाडे धरण, त्याचप्रमाणे सध्या अनेक गावांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या हेटवणे धरणाचेही पाणी मिळत आहे. या तिन्ही ठिकाणी उपलब्ध असलेल्या पाणी साठय़ातून पाणीपुरवठा केला जात आहे. तर जेएनपीटीसारख्या बंदराला व कामगार वसाहतीतील स्वतंत्रपणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायती तसेच वाडय़ांना व तीस हजारांची लोकसंख्या असलेल्या उरण शहराला रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. याच्याच जोडीला रानसई धरण खास करून ज्या कारणासाठी उभारण्यात आलेले होते. त्या औद्योगिक विभागातील उरणमधील नौदल तसेच ओएनजीसी प्रकल्पाला रानसईमधून पाणीपुरवठा केला जात आहे. धरणातील पाणीपुरवठय़ासाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या धरणापासून ३० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून येत आहेत. या जलवाहिन्यांना छिद्रे पाडून त्यातील पाणी शेतात वा तलावात साठवूण ठेवून नंतर ते पाणी पंपाच्या सहाय्याने टँकरद्वारे खासगी व्यवसायिकांना चोरी करून पुरविले जात आहे. तर उरण शहर तसेच ग्रामपंचायतींच्या परिसरात बेकायदा नळ जोडण्या देऊन अनेक ठिकाणी पाणी चोरी सुरू आहे. या संदर्भात उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता गळती वा चोरी संदर्भात आदेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर आस्थापनाची ग्रामपंचायतीची, एमआयडीसीची जलवाहिनी असेल त्या आस्थापनाकडे तक्रार करावी, अशी माहिती त्यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2016 रोजी प्रकाशित
उरणमध्ये पाणीचोरी, गळतीकडे शासनाचे दुर्लक्ष
उरण शहर तसेच ग्रामपंचायतींच्या परिसरात बेकायदा नळ जोडण्या देऊन अनेक ठिकाणी पाणी चोरी सुरू आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 05-04-2016 at 03:09 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government neglect water theft in uran