नवी मुंबई : मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर या पहिल्या टप्यातील खारघर ते पेंधर या पाच किलोमीटर लांबीच्या पहिल्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून आता केवळ केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांच्या सोयीने हा मार्ग लोकार्पण केला जाणार आहे. या पाच किलोमीटर लांबीच्या मार्गाला रेल्वे मंडळ व मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हिरवा कंदील दिला आहे. महामुंबई क्षेत्रातील ही पहिली मेट्रो सेवा दक्षिण नवी मुंबईच्या दळवळण सेवेला चालना देणारी असून येत्या डिसेंबपर्यंत पनवेल टर्मिनल्स कार्यान्वित करण्याच्या हालचाली रेल्वेने सुरू केलेल्या आहेत.

महामुंबई क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने सिडकोने चार मेट्रो मार्गाची आखणी केलेली आहे. यातील बेलापूर रेल्वे स्थानक ते पेंधर या अकरा किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम मे २०११ रोजी सुरू करण्यात आले आहे. मात्र या मार्गात कंत्राटदारांचे अनेक अडथळे आल्याने डिसेंबर २०१५ पर्यंत सुरू होणारा हा मार्ग तब्बल सात वर्षे रखडला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने चालना दिल्याने हा प्रकल्प आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे. हा प्रकल्प लवकर मार्गी लागावा यासाठी महामेट्रोला या मार्गाचे देखरेख व संचालनाचे काम देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या मार्गातील किमान खारघर ते पेंधर या ५.१४ किलोमीटर लांबीच्या मार्गातील ऑसिलेशन, व इर्मजन्सी ब्रेक डिस्टन्स चाचणी सप्टेंबर २०२१ रोजी पार पडली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यापूर्वी या मार्गावरील स्थापत्य कामे, व्हायडक्ट, उद्धवान, मेट्रो फर्निचर यांची कामे पूर्ण झालेली असून र्सिच डिझाईन अन्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनकडून कमाल वेगाचे प्रमाणपत्र ऑक्टोबर २०२१ मध्ये सिडकोला मिळाले आहे. यंदा रोलिंग स्टॉकची चाचणी करण्यात आली असून सिग्नल, विद्युत पुरवठा, मार्गिका यांची सर्व कागदपत्र आरडीएसओला देण्यात आली होती. त्यांनी या अहवालांची पडताळणी केली असून केवळ मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) व रेल्वे मंडळाची मंजुरी शिल्लक होती. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या मार्गाची पाहणी करुन प्रवासी वाहतूक करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे हा मार्ग सुरु करण्याचे केवळ सोपस्कर बाकी राहिले आहेत. मुसळधार पाऊस सुरू होण्याअगोदर तसेच पालिका निवडणुकांची आचारसंहितेपूर्वी हा मार्ग सुरू करण्यात येईल अशी चर्चा आहे.