नेरुळमधील बामणदेव मैदानाची तरुणांकडून स्वच्छता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई शहरातील विविध उपनगरांत ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत स्वच्छता अभियान राबवले जात आहे. यासाठी पालिकेचे आठ विभागांकडून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी, यासाठी भर दिला जात आहे. मात्र असे असताना याच महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या मैदानांची दुरवस्था झाल्यामुळे शहरातील मुलांना खेळण्यासाठी योग्य मैदान नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे पालिकेच्या मदतीची अपेक्षा न ठेवता नेरुळ येथील तरुणांनी बामणदेव झोटींगदेव मैदानाची स्वच्छता करून पालिका प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घातले आहे.

नवी मुंबई शहरातील मैदानांकड पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. नेरुळमधील पामबीच मार्गालगत असलेल्या बामणदेव झोटींगदेव मैदान याच अनास्थेचा बळी ठरले आहे. या मैदानामध्ये पावसाळ्यात डोक्याएवढे गवत वाढले होते. त्यात पावसाचा मुक्काम यंदा वाढल्याने हे गवत अधिकच फोफावले होते. दिवाळीनंतर मैदानी खेळांचा हंगाम सुरू होत असल्याने नेरुळ गाव तसेच नेरुळ सेक्टर २४, १६, १८ या परिसरातील मुलांना खेळण्यासाठी याच मैदानाचा पर्याय आहे. त्यामुळे पालिकेच्या मदतीची अपेक्षा न ठेवता या परिसरातील मुलांनीच मैदानातील गवत जाळले आहे. या वेळी शहरात स्वच्छता अभियान राबविणाऱ्या पालिकेला मैदानांच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने आम्हीच हे मैदान तयार केल्याचे येथील मुलांनी सांगितले.

तरुणांमध्ये नाराजी

१७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकासाठी नवी मुंबई शहरात मोठा गाजावाजा झाला होता. यासाठी करोडो रुपये खर्च करून फुटबॉलसाठीची मैदाने तयार करण्यात आली. परंतू इतर विभागातील मैदानांच्या देखभाल दुरुस्तीकडे मात्र आजतागायत दुर्लक्षच झाले आहे.त्यामुळे फिफासाठी रेट कार्पेट सुविधा मात्र शहरातील मुंलासाठीच्या मैदानांना बकालपण असल्याने पालिकेच्या दुष्टीकोनाबाबत युवकांमध्ये नाराजी आहे.

खेळायला जागा नसल्यामुळे  या मैदानाशिवाय पर्याय नाही. परंतू येथे मोठे  गवत आणि घाण असते. तसेच विषारी सर्पाचा देखील वावर असतो. याकडे दुर्लक्ष होत असून मैदानांच्या स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे.

गणेश पाटील, रहिवासी, नेरुळ,

शहरातील अनेक मैदाने खेळण्यायोग्य नाहीत. पालिकेने त्यांची देखभाल करायला हवी. नेरुळमधील बामणदेव झोटींगदेव मैदानही याच अनास्थेचा बळी ठरत आहे. याबाबत पालिकेच्या स्थायी समितीत आवाज उठवणार आहे.

नामदेव भगत, नगरससेवक, नेरुळ

शहरातील मैदानांच्या स्वच्छतेसाठी आणि देखभालीसाठी वेगळी व्यवस्था नाही. परंतू शहरातील मुलांना खेळण्यायोग्य मैदान करुन देण्यासाठी योग्य पर्यायी व्यवस्था करुन ही मैदाने नीटनेटकी करण्याचा नेहमीच पालिका प्रयत्न करते.

मेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त (सेवा)

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ground cleanliness issue nmmc
First published on: 23-11-2017 at 01:36 IST