परदेशी विमान वाहतूक सेवा बंद; परदेशातून मागणीही कमी

नवी मुबई : कोकणात नैसर्गिक आपत्तीमुळे हापूस आंब्याचे उत्पन्न घटले असताना करोना साथ रोगाने पुन्हा उचल खाल्ल्याने हापूस आंब्याच्या व्यापाराला फटका बसला आहे. परदेशी विमान वाहतूक बंद असल्याने हापूस आंब्याची निर्यात करणे शक्य झालेले नाही. ही वाहतूक प्रवासी विमानाने केल्यास परवडणार आहे, मात्र ती मालवाहतूक विमानाने केल्यास निर्यात व्यापाऱ्यांना परवडत नसल्याने हापूस आंब्याची निर्यात तुरळक सुरू आहे.

सर्वसाधारणपणे हापूस आंब्याच्या एकूण उत्पन्नातील ६० टक्के हापूस आंब्याची आखाती, आशियाई, युरोप व अमेरिका खंडात निर्यात केली जाते. यामुळे शेतकरी, बागायतदार, व्यापारी यांच्या हातात जास्त पैसे पडतात तर देशाला काही प्रमाणात परकीय चलन मिळते.

कोकणातून हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. फेब्रुवारीपासून ही आवक काही प्रमाणात वाढली असून मार्चच्या माध्यान्हापासून ही  आवक मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. देशातील विविध भागातून हापूस आंब्याची आवक मुंबईच्या बाजारात तुर्भे येथील एपीएमसी घाऊक बाजारातून होत असते. या एमएमआरडीए क्षेत्रात लागणारा हापूस आंबा विकला गेल्यानंतर सर्वाधिक विक्री ही आखाती देशात होत असून फेब्रुवारी पासून दुबई, अबुदाबी, सौदी, या देशात ही आवक समुद्र मार्गे सुरू झाली आहे पण ती सध्या मर्यादित आहे. याशिवाय सिंगापूर, मलेशिया या आशियाई देशातही हा आंबा निर्यात केला जातो. आखाती व आशियाई देशातील या निर्यातीनंतर युरोप व अमेरिका या खंडातील काही देशात कोकणातील हापूस आंब्याला एक वेगळा मान आहे. त्यामुळे निर्यातदार चांगल्या प्रतीचा हापूस आंबा या विकसित देशात पाठविण्यास प्राधान्य देतात. प्रवासी विमान वाहतुकीतून हा हापूस आंबा पाठविल्यास त्याचा खर्च प्रति डझन ६० ते ६५ रुपये जास्त येतो पण मालवाहतूक विमानातून हा हापूस आंब्याचा दर दुप्पट पडत असल्याने निर्यातदार हात आखडता घेत आहेत.  गेल्या वर्षी निर्यात आणि राज्यांतर्गत विक्री बंद पडल्याने कोकणातील हापूस आंबा बागायतदारांनी या आंब्याचे स्वत:च पणन केले होते. त्याला राज्य पणन महामंडळाने साथ दिली होती. यंदाही काही संघटनांनी नियोजन केले आहे पण परकीय चलन हमखास देणाऱ्या देशातील विमान वाहतूक बंद असल्याने हापूस आंब्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वच घटकांचे नुकसान होणार आहे.

करोनामुळे निर्यातीवर मोठय़ा प्रमाणात मर्यादा आली आहे. हापूस आंब्याची निर्यात घटली आहे. आखाती देशात हापूस आंबा पाठविला जात आहे. विमान वाहतूक खर्च वाढला आहे. १ एप्रिलपासून त्यात आणखी भर पडणार आहे. हापूस आंब्याला आज परदेशातही मागणी नाही. त्यामुळे निर्यात करणे कठीण झाले आहे. -युनूस बागवान, निर्यातदार, नवी मुंबई</strong>