हृदयविकाराच्या धक्का आलेल्या व्यावसायिकाला करोना चाचणीची सक्ती; विलंबामुळे मृत्यू झाल्याचा आरोप

नवी मुंबई : कोणत्याही प्रकारच्या रुग्णांसाठी प्रथम कोविड तपासणी करण्याची सक्ती घातली गेल्याने करोनेतर रुग्णांना पालिका आणि खासगी रुग्णालयात उपचार मिळण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वाशी येथील एका हॉटेल व्यावसायिकाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कोविड तपासणी करण्याच्या प्रक्रियेत त्याचा जीव गेल्याची घटना ताजी आहे. प्रतिजन तपासणी ही त्यावर पर्याय असला तरी कोणत्याही रुग्णाला सर्वात अगोदर प्राथमिक उपचार मिळणे आवश्यक आहे. मात्र, कोविड चाचणीच्या सक्तीमुळे अनेकांना जीव गमवायची वेळ आली आहे. याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नागरिक बोलून दाखवत आहेत.

नवी मुंबईत रुग्णांची संख्या २० हजाराच्या घरात पोहोचली आहे. चाचणी सकारात्मक आल्यानंतरघरात अलगीकरण केलेल्यांची संख्या ७१ हजारच्या आसपास आहे. वाशी सेक्टर १४, बेलापूर सेक्टर ३, नेरुळ येथील आगरी कोळी भवन, सेक्टर ५ मधील सावली, ईटीसी केंद्र वाशी, कोपरखैरणे सेक्टर ५ मधील बहुउद्देशीय केंद्र, सिडको प्र्दशन केंद्र वाशी, या ठिकाणी एक हजार ४७८ रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय पालिकेच्या कोविड रुग्णालयात १२६ रुग्ण अत्यवस्थ आहेत.

टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यानंतर काही ठिकाणी अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत तर करोनेतर आजारांनी डोके वर काढले आहे. दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसात साथीचे इतर आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पामबीच मार्गावर अनेक छोटय़ा मोठय़ा अपघातात नागरिक जखमी झाले आहेत. मात्र, खासगी वा पालिका रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या कोणत्याही प्रकाराचा रुग्ण असो त्याला सर्वप्रथम कोविड तपासणी करण्याची अट घातली जात आहे. सर्वसाधारपणे स्व्ॉब तपासणीचे अहवाल येण्यास किमान २४ तास लागत आहेत. तर पालिकेने अनेक ठिकाणी प्रतिजन तपासण्या उपलब्ध करून दिल्याने त्या तपासणीचे अहवालही येण्यास अर्धा ते एक तास लागत आहे. त्यासाठी या रुग्णाला प्रतिजन तपासणी केंद्रापर्यंत न्यावे लागत आहे. कोविड तपासणी केल्याशिवाय उपचार नाहीत, अशी अट खासगी वा पालिका रुग्णालयांनी घातल्याने वाशी येथील एका हॉटेल मालकाला हदयविकाराचा झटका आल्यानंतर  वेळीच उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे रुग्णास जीव गमवावा लागला. यासंदर्भात तक्रार रुग्णाचे नातेवाईक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे करणार आहेत.

महिलेची फरफट

पोटात दुखू लागल्यानंतर एका महिलेला वाशी येथील एकाही खासगी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. अखेर पालिका रुग्णालयात या महिलेवर उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला कोविड तपासणी बंधनकारक करण्यात आली. कोणत्याही प्रकारचा रुग्ण हा कोविड बाधित आहे असे गृहित धरून त्यावर सर्व उपाययोजना करून उपचार का केले जात नाहीत, असा सवाल  उपस्थित केला जात आहे. तपासणीच्या सक्तीपोटी करोनेतर रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याचे चित्र आहे.