अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या द्रोणागिरी डोंगराला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व असून याच डोंगरामुळे आतापर्यंत उरणचे नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण झाले आहे. त्यामुळे उरणची सुरक्षा भिंत असलेला हा डोंगर वाचवण्यासाठी ‘द्रोणागिरी बचाव समिती’ने आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी डोंगराच्या पायथ्याशी उत्खनन करताना समितीचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. मात्र तरीही द्रोणागिरीच्या पायथ्याशी काही प्रमाणात उत्खनन सुरू असल्याची तक्रार समितीने तहसीलदार व उरण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा द्रोणागिरीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रायगड जिल्ह्य़ात समुद्रकिनारी वसलेल्या अनेक तालुक्यांचे १९८९, २००५मध्ये आणि त्सुनामीमुळे मोठे नुकसान झाले होते. परंतु या आपत्तींचा तडाखा उरणला कधीही बसला नव्हता. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, समुद्रकिनाऱ्यावरील द्रोणागिरी डोंगर! मात्र या डोंगराच्या पायथ्याशी यंत्रांच्या साहाय्याने बेकायदा मातीउत्खनन केले जात असल्याची तक्रार द्रोणागिरी बचाव समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी उरणच्या तहसीलदारांकडे केली आहे. ही माती अन्यत्र भरावासाठी वापरली जात आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जमिनीवर काम करण्यासाठी माती काढल्यास व त्याचा उपयोग त्याच ठिकाणी केल्यास काहीच हरकत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या संदर्भात उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांच्याशी संपर्क साधला असता तक्रारीनंतर मंडळ अधिकाऱ्यांना पाठवून आपण उत्खनन बंद केल्याचे त्यांनी सांगितले. तरीही जर उत्खनन होत असेल, तर कारवाई करून साहित्य जप्त करण्याचेही संकेत त्यांनी दिले.
याच डोंगराच्या कुशीत देशातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प आहे. त्यामुळे या डोंगराचे महत्त्व अधिकच वाढले आहे. द्रोणागिरी देवीचे मंदिर असलेल्या या डोंगराचा आकार तीनही बाजूंनी सारखाच आहे. रामायणातील कथेनुसार लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी मारुतीने उचललेल्या द्रोणागिरी डोंगराचाच हा एक तुकडा असल्याचे म्हटले जाते. तर याच डोंगरावरील किल्ल्यात मराठय़ांचेही राज्य होते. त्यामुळे हा डोंगर ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्टय़ा महत्त्वाचा आहे. त्याचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. – सुधाकर पाटील, अध्यक्ष, द्रोणागिरी बचाव समिती