नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या वाशी खाडी पुलावरील वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी बहुचर्चित असलेल्या तिसऱ्या वाशी खाडीपुलाचे काम वेगात सुरु आहे. परंतू या तिसऱ्या खाडीपुलाच्यासाठी जुन्या मार्गावर असलेल्याटोल नाक्यावरील दोन्ही बाजूची प्रत्येकी एक लेन कमी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाताना टोलनाक्याच्या पुढे वाशी उड्डाणपुलावरून जाताना जपूनच गाडी चालवावी लागत होती.याच उड्डाणपुलावर पावसाने पडलेले खड्डे व ते बुजवण्यासाठी तात्पुरता केलेला डांबरचा वापर यामुळे या पुलावर उन्हामुळे डांबर व खडी मिश्रित वेडेवाकडे खड्डे यामुळे हया उड्डाणपुलावरून गाडी चालवणे धोक्याचे बनले होते..रस्त्यावरील उंचवट्यामुळे अनेक दुचाकीस्वार येथे गाडीवरून कोसळल्याच्या घटनाही घडल्या होत्या. याबाबत लोकसत्ताने वृत्त देताच तात्काळ मंगळवारी येथील डांबरीकरणाचे उंचवटे दूर करण्यात आले व नव्याने खड्डे बुजवण्यात आले.वाशी टोल नाक्यावर टोलवसुलीचे काम करणाऱ्या एमईपी कंपनीकडे वाशी उड्डाणपुल देखभालीसाठी एमएसआरडीसीने दिला आहे. त्यामुळे एमईपी कंपनीने तात्काळ येथील खड्डे बुजवले तर पावसाळा संपताच पुन्हा या उड्डाणपुलावरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती एमईपी कंपनीकडून देण्यात आली. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने व लोकसत्ताने ते निदर्शनास आणून देताच तात्काळ दुरुस्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>नैसर्गिक शेती आणि कृषी व्यवसाय वाढविण्यावर लक्ष केंद्रित – अब्दुल सत्तार
वाशी टोलनाक्यावर वाहनाचा अतिरिक्त बोजा असल्याने या टोलनाक्यावर सातत्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. सातत्याने होणारी वाशी खाडी पुलावरील वाहनांची गर्दी यासाठी येथे तिसऱ्या पुलाची निर्मिती करण्यात येत असून या पुलाच्या निर्मितीसाठी एल अँन्ड टी कंपनीकडून कामाला गती देण्यात आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या व मुंबईचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वाशी खाडीपुलावरील वाहनांची सातत्याने गर्दी पाहायला मिळते.पावसाळ्यात या वाशी उड्डाणपुलावर पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर खड्डे पडले होते.परंतु या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा >>>रम्मी पत्ते खेळताय, तर ही बातमी नक्की वाचा…जुगारबंदी कायद्याअंतर्गत होतेय कारवाई
तिसऱ्या खाडीपुलाच्या कामामुळे पुणे व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकांवर टोलनाक्यावर पहाटेपासूनच गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे वाहनचालकांना सातत्याने वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे तिसरा खाडी पुल लवकरात लवकर पूर्ण झाल्यावरची येथील वाहतूक कोंडी फुटेल असे चित्र आहे..
वाशी उड्डाणपुलावर असलेले खड्डे ,डांबरीकरणाचे उंचवटे केले दूर….
वाशी उड्डाणपुलावरील पावसाळ्यात तात्पुरती खड्डे दुरुस्ती उड्डाणपुलावर करण्यात आली होती. डांबरीकरणाच्या उंचवट्यामुळे वाहनचालकांना अडचणी येत होत्या.त्यामुळे संपूर्ण डाबरीकरणाचा भाग काढून घेण्यात आलेला आहे. याठिकाणी आज नव्याने दुरुस्ती करण्यात आली आहे. पावसाळा संपताच तात्काळ येथील डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. – विजय माने, एमईपी कंपनी