नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे याविरोधात मागील आठवड्यापासून धडाकेबाज कारवाई सुरू केली असून शुक्रवारी महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर विभागात विविध हॉटेलचालकांनी अनधिकृतरीत्या बांधलेल्या शेड व बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली. बेलापूर विभाग कार्यालय क्षेत्रातील सेक्टर १५ येथील महेश हॉटेल, प्रणाम हॉटेल, हॉटेल लक्ष्मी, मालवणी कट्टा, अश्विथ हॉटेल, मॅकडोनाल्ड्स, कबाना बार, द स्कॉड, द चाप हाऊस, पॅनेशिया, एस स्पाईस हे व्यावसायिक मार्जिनल स्पेसचा शेड टाकून वापर करीत होते.

हेही वाचा : मध्य रेल्वेच्या वतीने आज मेगा ब्लॉक

तसेच सनसिटी इमारतीसमोर विनापरवानगी पावसाळी शेड उभारण्यात आली होती. या अनधिकृत बांधकामांस व वापरास बेलापूर विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. बेलापूर विभाग कार्यालयामार्फत तोडक कारवाई करून २५ लाख रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, संजय तायडे, सागर मोरे, प्रबोधन मवाडे यांच्या नियंत्रणाखाली तसेच विविध प्रशासकीय अधिकारी यांच्या सहयोगाने अतिक्रमण विभागाकडील पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण शेड, बांधकाम तोडण्यात आले. या धडक मोहिमेसाठी बेलापूर विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व ४० मजूर कार्यरत होते. यामध्ये चार गॅस कटर, एक इलेक्ट्रिक हॅमर, तीन जेसीबी व एक पोकलेन यांचा वापर करण्यात आला.

हेही वाचा : नवी मुंबई : मद्य दिले नाही म्हणून हाणामारी; पहाटे चारची घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले

मागील अनेक वर्षे अतिक्रमण विभागात एकच उपायुक्त ठाण मांडून बसल्याने शहरभर अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला होता. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. या आठवड्यात बेलापूर, नेरुळ, तुर्भे, घणसोली, गोठिवलीसह विविध ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू झाल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. “नवी मुंबई शहरात अनधिकृत बांधकामांवर मागील काही दिवसांपासून तोडक कारवाई करण्यात येत असून यापुढेही अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई केली जाणार आहे”, असे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डाॅ. राहुल गेठे यांनी म्हटले आहे.